आयसीसी क्रमवारीत बुमराहला धक्का, आर अश्विन कसोटीचा `नवा किंग`... रोहित, यशस्वीचीही मोठी झेप
ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रवीचंद्र अश्विन गोलंदाजी क्रमवारीत नंबर वन पोहोचलाय. तर फलंदाजीत रोहित शर्मा आणि यशस्वीने मोठी झेप घेतली आहे.
ICC Test Ranking, R Ashwin : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) थेट अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर फलंदाजीत टीम इंडियाचा (Team india) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठी झेप घेतली आहे. याशिवाय युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनाही मोठा फायदा झाला आहे. आर अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या आपल्या कसोटी कारकिर्दीतील शंभराव्या कसोटी सामन्यात तब्बल 9 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे आयसीसीने कसोटी क्रमवारीत अश्विनने नंबर वनचा ताज मिळवला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या जसप्रीत बुमराहला अश्विनने मागे टाकलं आहे.
100 व्या कसोटी अश्विनची कमाल
इंग्लंडविरुद्धचा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धर्मशालात खेळवण्यात आला होता. आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हा 100 सामना होता. या सामन्यात अश्विनने कमालीची गोलंदाजी केली. धर्मशाला कसोटीच्या पहिल्या डावात अश्विनने चार विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात त्याने पाच विकेट घेण्याची कामगिरी केली. एका कसोटीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची अश्विनची कसोटी कारकिर्दीतील ही 36 वी वेळ होती. अश्विनच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत शानदार विजय मिळवला. ही कसोटी मालिका भारताने 4-1 अशी जिंकली.
क्रिकेट कारकिर्दीत 100 पेक्षा जास्त कसोटी खेळणारा आर अश्विन हा भारताचा चौदावा खेळाडू ठरलाय.
रोहित शर्माचीही मोठी झेप
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांची मालिकेतील दमदार विजयानंतर भारतीय खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पाच स्थानांची झेप घेत आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवरीत थेट सहाव्या क्रमांकावर मजल मारली आहे. आशिवाय शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाललाही फायदा झाला आहे. शुभमन गिल 11 स्थानांची झेप घेत विसाव्या क्रमांकावर पोहोचलाय. तर यशस्वी जयस्वालला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यशस्वी जयस्वालला नुकतंच आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराने गौरवलं आहे. त्याने न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि श्रीलंकेच्या पथुम निसांकाला मागे टाकलं.
कुलदीप यादवलाही फायदा
अश्विनबरोबरच चायनामन कुलदीप यादवनेही क्रमवारीत चांगली मजल मारली आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कुलदीप यादवने सात विकेट घेतल्या. यामिळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी घोषित करण्यात आलं. या कामगिरीमुळे कुलदीप यादव आयसीसी कसोटी क्रमवारीत 16 व्या स्थानावर पोहोचला आहे.