टीम इंडियाच्या दौऱ्याआधी मोठी घटना, श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची घरात घुसून हत्या.. पत्नी, मुलांसमोर गोळ्या झाडल्या
Sri Lanka Former Captain Shot Dead : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी श्रीलंकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधाराची गुंडानी घरात घुसून हत्या केली.
Dhammika Niroshana Shot Dead : भारत आणि श्रीलंकेदरम्यान टी20 आणि एकिदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर (Team India Tour of Sri Lanka) जाईल. पण त्याआधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची त्याच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गुंडांनी त्याच्या पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या झाडून हत्या केली.
काय आहे नेमकी घटना
हत्या करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेटरचं नाव धम्मिका निरोशन (Dhammika Niroshan) असं होतं. धम्मिका हा श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचा माजी कर्णधार होता. धम्मिका हा 41 वर्षांचा होता आणि मंगळवारी म्हणजे 16 जुलैला त्याची हत्या करण्यात आली. धम्मिका हा अंबालांगोडा इथल्या मावथा इथं आपल्या कुटुंबासोबत राहातो. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार घटना घडली त्या दिवशी धम्मिका, त्याची पत्नी आणि दोन मुलं घरीच होती. सकाळच्या सुमारात बंदुकधारी व्यक्ती त्यांच्या घरात घुसला आणि धम्मिकावर अंदाधुंद गोळीबार केला. यात धम्मिकाचा जागीच मृत्यू झाला. धम्मिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
धम्मिकावर त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसमोर हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. धम्मिकाच्या हत्येमागे कोणाचा हात आहे, हल्लेखोराचा उद्देश काय होता? याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. धम्मिाक निरोशनने अंडर-19 क्रिकेटसाठी भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात तो स्टार खेळाडू इरफान पठाण आणि पार्थिव पटेलविरुद्ध खेळला होता.
धम्मिका निरोशनाची क्रिकेट कारकिर्द
धम्मिका निरोशना आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीलाच प्रसिद्धीच्या झोतात आला. श्रीलंका क्रिकेटचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. पण दुर्दैवाने तो जास्त क्रिकेट खेळू शकला नाही. धम्मिका 2001 ते 2004 दरम्यान गॉल क्रिकेट क्लबसाठी 12 प्रथम श्रेणी आणि 8 लिस्ट ए सामने खेळला. ऑलराऊंडर खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या धम्मिका निरोशनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 300हून अधिक धावा आणि 19 विकेट घेतल्या.
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा
दरम्यान, टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. टीम इंडिया जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन टी0 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. 27, 28 आणि 30 जुलैला टी20 सामने खेळवले जाणार आहेत. तर 2 ऑगस्टपासन एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.