क्रिकेटमधला दुसरा मोठा विजय! एक टीम ५९६ रनवर, दुसरी २५ रनवर आऊट
ऑस्ट्रेलियातल्या दोन महिला टीममध्ये एक मजेदार मॅच झाली.
ऍडलेड : ऑस्ट्रेलियातल्या दोन महिला टीममध्ये एक मजेदार मॅच झाली. ऍडलेडमध्ये खेळवण्यात आलेल्या या मॅचमध्ये नॉर्दन डिस्ट्रीक्ट्सनं ५० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून ५९६ रन केले. तर विरोधी टीम फक्त २५ रनवर ऑल आऊट झाली. आणि ५७१ रननं ही मॅच गमावली. पोर्ट ऍडलेडमध्ये सुपर वूमन फर्स्ट ग्रेडच्या मॅचमध्ये पोर्ट ऍडलेडविरुद्ध एसएसीए पीसी स्टेटवाईडनं ५९६ रनचा डोंगर उभारला. यानंतर पोर्ट ऍडलेडची टीम २५ रनवर ऑल आऊट झाली. पोर्ट ऍडलेडचे ४ बॅट्समन शून्य रनवर आऊट झाले.
नॉर्दन डिस्ट्रीक्ट्सकडून कर्णधार मॅकफारलिन, सॅम बॅट्स, तबिता सिवले आणि डेरिक ब्राऊन यांनी शतकं केली. मॅकफारलिननं ८० बॉलमध्ये सर्वाधिक १३६ रन केले. बॅट्सनं ७१ बॉलमध्ये नाबाद १२४, सिवलेनं ५६ बॉलमध्ये १२० आणि ब्राऊननं ८४ बॉलमध्ये नाबाद ११७ रन केले.
पोर्ट ऍडलेडनं या मॅचमध्ये ८८ जादा रन दिल्या. यामध्ये ७५ वाईड होते. नॉर्दन डिस्ट्रीक्ट्सनं या मॅचमध्ये ६४ फोर आणि ३ सिक्स मारले. पोर्ट ऍडलेडची टीम १०.५ ओव्हरमध्येच ऑल आऊट झाली.
क्रिकेट इतिहासातला दुसरा मोठा विजय
क्रिकेट इतिहासातला हा दुसरा मोठा विजय आहे. लिस्ट ए मॅचमध्ये २००७ साली श्रीलंकेच्या कांड्यन लेडीज टीमनं पुष्पांदाना लेडीज विरुद्ध ५० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून ६३२ रन केले होते. याबदल्यात पुष्पांदाना लेडीज टीम फक्त १८ रनवर ऑल आऊट झाली. कांड्यन लेडीजनं ही मॅच ६१४ रननी जिंकली.