Team India Australia Tour : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला (Team India) दोन सामन्यात लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला असून टीम इंडियाने मालिकाही गमावली आहे. यादरम्यान बीसीसीआयने (BCCI) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी (Border-Gavaskar Trophy) टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या 15 खेळाडूंपैकी 8 खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या तब्बल 11 खेळाडूंना आताच्या संघात संधी मिळालेली नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि मु्ख्य प्रशिक्षक गौतम गंभीर युवा खेळाडूंना घेऊन बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला सामोरं जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 पैकी 8 खेळाडू पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 18 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. यापैकी तीन खेळाडू हे राखीव आहेत. मुख्य पंधरा खेळाडूंपैकी यशस्वी जायसवाल, अभिमन्यु ईश्वरन, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा हे पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत. यातील तीन खेळाडूंनी टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण केलं आहे. तर तीन खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे. 


भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी सामन्यांच्या मोठ्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. हा दौरा जवळपास अडीच महिन्यांचा आहे. त्यामुळे खेळाडूंवरचा ताण आणि दुखापत लक्षात घेऊन काही युवा खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यात अभिमन्य ईश्वरन, नीतीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांची कसोटीत पदार्पण होण्याची शक्यता आहे. 


तीन खेळाडूंचा कसोटी संघात होणार पदार्पण
भारतीय संघात नीतीश कुमार रेड्डीला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून समावेश होऊ शकतो. टीम इंडियात चौथ्या वेगवान गोलंदाजाची कसर भरुन काढण्यासाठी नीतीशला संधी मिळू शकते. नीतीशने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पादर्पण केलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत नीतीशने अष्टपैलू खेळाची झलक दाखवली होती. त्याआधी आयपीएलमध्येही त्याने कमाल केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नीतीश रेड्डीने 21 सामन्यात 708 धावा केल्या असून यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 55 विकेटही त्याच्या नावावर आहेत. 


वैयक्तिक कारणामुळे कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. अशात रोहित शर्माच्या जागी अभिमन्यु ईश्वरनला टीम इंडियात यशस्वी जयस्वालबरोबर सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. अभिमन्युकडे प्रथम श्रेणी क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. 99 पसामन्यात त्याने 7638 धावा केल्या आहेत. यात 27 शतकं आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. 


याशिवाय उजव्या हाताचा वेगावन गोलंदाज हर्षित राणालही आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.  आयपीएलमध्ये हर्षितने प्रभावी कामगिरी केली होती. अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही हर्षितने दमदार कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं होतं. हर्षित केवळ 9 प्रशम श्रेणी सामने खेळला आहे. मोठी स्पर्धा खेळण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव असणार आहे.