Sarfaraz Khan : सरफराज खान... आज हे नाव क्रिकेट जगतात गाजत आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजने टीम इंडियातर्फे  (Team India) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेममध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात टीकाकारांची तोंडं बंद केली. मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईकर सरफराज खानला (Sarfaraz Khan) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी मिळाली. सरफराजनेही या संधीचं सोनं केलं. राजकोट कसोटी सामन्याच्या (Rajkot Test) पहिल्या डावात सरफराजने 62 तर दुसऱ्या डावात नाबाद 67 धावा केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरफराजा खानने ज्या पद्धतीने इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांचा सामना केला, त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. पहिला आंतरराष्ट्रीय सामने खेळत असला तरी सरफराजचा खेळतानाचा आत्मविश्वास कमालीचा होता. इंग्लंड सारख्या बलाढ्या संघांसमोरही तो अगदी नैसर्गिक खेळ करत होता. सरफराज हा आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. राजकोट कसोटीतही त्याच्याकडून हीच खेळी पाहायाला मिळाली. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण नव्हतं. 


स्थानिक क्रिकेटमध्ये रनमशीन
सरफराज खानने टीम इंडियात पदार्पण करण्यासाधी स्थानिक क्रिकेटमध्ये हजारो धावा केल्या आहेत. रणजी ट्रॉफी स्पर्धेत तो रनमशीन म्हणून ओळखला जातो. रणजी ट्ऱॉफीत धावांचा डोंगर रचूनही सरफराजसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले नव्हते. पण मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर बीसीसीआयकडून सरफराज खानच्या नावाचा विचार झाला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सरफराजच्या नावावर 14 शतकं आणि 4 हजार धावा जमा आहेत. सर्फराजने आतापर्यंत 36 फर्स्ट क्रिकेट सामान्यात 80 च्या स्ट्राईक रेटने 3380 धावा केल्या आहेत. नाबाद 301 नाबाद ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याची धावा करण्याची त्याची क्षमता आणि संयम कसोटी क्रिकेटसाठी एकदम योग्य असल्याचं दिग्गज क्रिकेटरही मान्य करतात.


सरफराजची कठोर मेहनत
टीम इंडियात पदार्पण करण्यासाठी सरफराज खानने कठोर मेहनत घेतली आहे. राजकोट कसोटीनंतर याचा मोठा खुलासा झाला आहे. पीटीआयाने दिलेल्या रिपोर्टनुसार सरफराज गेल्या तब्बल 15 वर्षांपासून दररोज 500 चेंडू खेळण्याचा सराव करतो. हेच कारण आहे की फिरकी विरोधात सरफराज अगदी सहजतेने खेळू शकतो. मुंबईच्या ओव्हल, क्रॉस आणि आझाम मैदानात सरफराज दररोज ऑफ, लेग आणि डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजांसमोर फलंदाजीचा सराव करतो, असं त्याला अगदी जवळून पाहिलेल्या कोचने सांगितलं.


पाच प्रशिक्षकांचा हात
सरफराजच्या यशामागे एक-दोन नाही तर तब्बल पाच प्रशिक्षकांचा हात आहे. सरफारजला तयार करण्याचं सर्वात मोठं श्रेय त्याचे वडिल नौशाद यांना जातं. पण याशिवाय भुवनेश्वर कुमारचे कोच संजय रस्तोगी, मोहम्मद शमीचे कोच बदरुद्दीन शेख, कुलदीप यादवचे कोच कपिल देव पांडे, गौतम गंभीरचे कोच संजय भारद्वाज आणि भारत-ए संघाचा कर्णधार अभिमन्यु ईश्वरनचे वडिल आरपी ईश्वरने यांनी सरफराज घडवण्यात मोठा वाटा उचलला आहे. कोविड लॉकडाऊन काळातही सरफराजने फलंदाजीचा सराव सोडला नव्हता. मुंबईपासून  तब्बल 1600 कमी दूर आझमगडमध्ये तो फलंदाजीचा सराव करत होता.