`दुसरा जन्म मिळाला` विराट कोहलीने बदललं रोहित शर्माचं नशीब... हिटमॅनने सांगितली कहाणी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा बादशाह मानला जातो. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने खोऱ्याने धावा केल्यात. पण सुरुवातीच्या काळात कसोटी क्रिकिटेमध्ये रोहितला अशी कामगिरी करता आली नव्हती.
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) क्रिकेटचा बादशाह मानला जातो. एकदिवसीय, टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्येही दमदार संघाला दमदार सुरुवात करुन देण्यात माहिर आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या कानपूर कसोटीत रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या सलामीच्या जोडीने टी20 फलंदाजी करत इतिहास रचला होता. पण कारकिर्दीच्या सुरुवातीला रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमध्ये धीमी सुरुवात झाली. आता या फॉर्मेटमध्येही तो कमाल करतोय. कसोटी क्रिकेटमधला हा आपला पुर्नजन्म असल्याचं तो मानतो आणि याचं श्रेय तो विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना देतो.
2019 मध्ये मिळाली सलामीची संधी
रोहित शर्माने दिलेल्या एका मुलाखतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रेड-बॉल कारकीर्दीला पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं म्हटलं आहे. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराट आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका सराव सामन्यात रोहित शर्माला सलामीला फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. पण या सामन्यात रोहित शून्यावर बाद झाला. पण यानंतरही रोहितने एकदिवसीय आणि टी20 सारखंच कसोटीतही आक्रमक खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर रोहितला ऑक्टोबर 2019 मध्ये पहिल्यांदा सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचं रोहितने सोनं केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने तब्बल 176 धावांची शानदार खेळी केली.
रोहित शर्माने केला खुलासा
रोहित शर्माने जतीन सप्रूच्या यूट्यूब चॅनेलवर विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्याबाबत मोठा खुलासा केली. 'मी रवी शास्त्री आणि विराट कोहलीचा खूप आभारी आहे, त्यांनी फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. कसोटी क्रिकेटमध्ये मला सलामीला खेळवण्याच निर्णय सोपा नव्हता. पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांनी एक सराव सामना खेळण्यास सांगितलं होतं. पण मी पहिल्याच चेंडूवर बाद झालो. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता हे माझ्या लक्षात आलं. त्याचेवळी कसोटी क्रिकेटमधला दुसरा जन्म झाल्यासारखा वाटला. मला माहित होते की मला या संधीचा फायदा घ्यायचा आहे' असं रोहितने या मुलाखतीत सांगितलं आहे.
रोहित शर्माची कसोटी कारकिर्द
रोहित शर्माने 2013 मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत रोहित शर्माने 61 कसोटी सामन्यात 4180 धावा केल्या आहेत. यात 12 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक द्विशतकही जमा आहे.