Team India Rahul Dravid : रोहित शर्माचं नेतृत्व आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनखाली टीम इंडियाने (Rahul Dravid) टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2024) जेतेपद पटकावलं. हा आपल्या प्रशिक्षकपदाच्या काळातील सर्वात आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितलं आहे. राहुल द्रविड यांनी तीन वर्ष टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षक पद सांभाळलं. या काळात टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. आता कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळातील अनुभव क्रिकेट चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी20 वर्ल्ड कप जेतेपदाचा अभिमान
स्टार स्पोर्ट्स या क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल द्रविड यांनी दिलखुलास उत्तरं दिली. गेल्या काही काळा टीम इंडिया अनेकवेळा ट्रॉफीच्या जवळ पोहोचली. टी20 वर्ल्ड 2022 ची सेमीफायनल गाठली, वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली, आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही मजल मारली, पण प्रत्येक वेळी जेतेपदाने हुलकावणी दिली. शेवटची रेषा ओलांडण्यात आम्ही कमी पडलो, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे. पण अखेर टी20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावत टीम इंडियाने 13 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवला. 


टीम इंडियाने गेल्या अडीच वर्षात कठोर मेहनत केली आहे. त्यामुळेच टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीमच्या खेळाडूंसह बेधुंद जल्लोष केला असं राहुल द्रविड यांनी म्हटलंय. पण असं सेलिब्रेशन करताना थोडं सतर्क राहायला हवं माझा मुलगा तो व्हिडिओ पाहून वडिलांना काय झालंय असा विचार करत असेल, असं राहुल द्रविड यांनी मिष्किलपणे सांगितलं.


2021 मध्ये प्रशिक्षकपदाची कमान
राहुल द्रविड यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांचा पहिला दौरा त्या देशात होता, ज्या देशात टीम इंडिया कधीच कसोटी मालिका जिंकलेली नाही मुलाखतीत राहुल द्रविड यांना प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील सर्वात कठिण काळ कोणता होता असा प्रश्न विचारण्यात आला. 


प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळातील कठिण  काळ
या प्रश्नावर राहुल द्रविड यांनी दक्षिण आफ्रिका दौरा हा आपल्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळातील सर्वात कठिण काळ असल्याचं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाने पहिला कसोटी सामना जिंकला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिली कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याची ही चांगली संधी होती. आमच्याकडे चांगली संधी होती. पण पुढच्या दोन्ही कसोटी सामन्यात आम्ही विजयाच्या अगदी जवळ असून पराभूत झालो. दोन्ही कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात चांगली संधी होती, पण दक्षिण आफ्रिका संघाने चांगला खेळ केला. चौथ्या डावात दक्षिण आफ्रिका आव्हान गाठण्यात यशस्वी ठरले. हा दौरा आपल्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील कठिण काळ असल्याचा खुलासा राहुल द्रविड यांनी केला.


त्या दौऱ्यात खूप काही शिकायला मिळालं. कोणत्या गोष्टींवर जास्त काम करण्याची गरज असल्याचं यावेळी समजलं. सर्व दिवस एकसारखे नसल्याचं त्यावेळी कळलं असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे. प्रत्येक वेळी विजय मिळतो असं नाही, तुम्ही वर्ल्ड क्लास संघांचा करता आहात, हे समजून घ्यायला हवं असंही राहुल द्रविड यांनी सांगितलं.