IND vs WI: वडिलांविरुद्ध डेब्यू आता मुलाविरुद्ध 110 वा कसोटी सामना खेळणार, विराट कोहलीचा असाही विक्रम
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान बुधवारी पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी खास असणार आहे. ज्या खेळाडूंविरुद्ध विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता त्याच खेळाडूच्या मुलाविरुद्ध तो 110 कसोटी सामना खेळणार आहे.
Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या (Ind vs WI First Test) पहिल्या कसोटीत एक खास विक्रम होणार आहे. याआधी असा विक्रम फक्त सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर जमा आहे. वडील-मुलाविरुद्ध खेळण्याचा विक्रम विराट कोहली करणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, यातला पहिला सामना 12 जुलैपासून रंगणार आहे. पहिला कसोटी सामना डोमिनिकामध्ये (Dominika) खेळवला जाणार आहे.
विराट कोहलीने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वेस्टइंडिजविरुद्ध तो पहिला कसोटी सामना खेळला. टीम इंडियाबरोबर विराट कोहली वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर गेला होता आणि किंग्सटनमध्ये तो क्रिकेट कारकिर्दितला पहिला कसोटी सामना खेळला. यावेळी वेस्ट इंडिज संघात दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलही (Shivnarine Chanderpaul) होता. आता 2023 मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे आणि यावेळी त्याच्या समोर आहे शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा टॅगनारिन चंद्रपॉल (Tagenarine Chanderpaul).
विराट कोहलीचा हा 110 वा कसोटी सामना आहे. म्हणजे कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना वडीलांविरुद्ध तर 110 वा कसोटी सामना मुलाविरुद्ध खेळण्याचा विक्रम विराटच्या नावावर होणार आहे. वडिल-मुलाच्या जोडीविरुद्ध खेळणारा विराट कोहली दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वडिल-मुलाच्या जोडीविरुद्ध खेळला आहे. सचिन 1992 मध्ये ऑस्ट्रेलियावरुद्ध खेळला या संघात जेफ मार्श होता. त्यानंतर 2011-12 मध्ये सचिन जेफ मार्शचा मुलाग शॉन मार्शविरुद्ध खेळला. विशेष म्हणजे 1992 मध्ये सचिन तेंडुलकर पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तर 2011-12 मध्ये तो कारकिर्दितली शेवटची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया गेला होता.
विराटची विंडिजविरुद्ध कामगिरी
विराट कोहलीचा हा 110 वा कसोटी सामना असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध विराट आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 822 धावा केल्या आहेत. 200 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. 13 पैकी नऊ कसोटी सामने विराट वेस्टइंडिजमध्ये खेळलाय. यात त्याने एका शतकासह 463 धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.