Team India Tour of Pakistan, Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या आयपीएल (IPL) 2024मध्ये व्यस्त आहेत. यानंतर टीम इंडिया जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळणार आहेत. यादरम्यान पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही यावरुन चर्चा रंगली आहे. याबाबतत भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) सचिव जय शह यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं आहे.  (Team India Pakistan Tour)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीव शुक्ला यांचं मोठं वक्तव्य
आता याच प्रकरणात बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांचं वक्तव्य समोर आलं आहे. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही याचा निर्णय फक्त भारत सरकार करेल, त्यांचा निर्णय बीसीसीआयला मान्य असेल असं राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत भारत सरकारचा निर्णय अंतिम असेल, सरकारने परवानगी दिली तर टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवलं जाईल असं राजीव शुक्ला यांनी सांगितलं.


चॅम्पियन्स ट्ऱॉफीला अद्याप एक वर्ष बाकी आहे, या वर्षभरात परिस्थिती किती बदलते यावरही भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याचं भवितव्य अवलंबून असल्याचं जय शाह यांनी म्हटलं होतं. 


राजीव शुक्ला यांचा पाकिस्तान दौरा
याआधी एशिया कप स्पर्धेदरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तान दौरा केला होता. या दौऱ्यात रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात आला होता. नुकतीच भारताचा डेव्हिस संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. भारतीय टेनिस संघाला  (India Tennis Team) पाकिस्तान दौऱ्यासाठी भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आलं होतं. 


त्यामुळे भारतीय क्रिकेट संघालाही पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची परवानगी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


16 वर्षांपूर्वी शेवटचा दौरा
भारतीय क्रिकेट संघाने 2008 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी महेंद्र सिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. पाकिस्तान दौऱ्यात भारतीय संघ एशिया कप स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेत श्रीलंकेने भारताचा 100 धावांनी पराभव केला होता.