हार्दिक पांड्या कर्णधार, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बाहेर... श्रीलंकेविरुद्ध अशी असेल टीम इंडिया
IND vs SL T20 Series : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यानच्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. 26 जुलैपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून यात तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
India Squad For Sri Lanka T20 Series : भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) दरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले तीन सामने झाले असून भारत 2-1 अशा आघाडीवर आहे. आणखी दोन सामने खेळायचे बाकी आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडिया (Team India) श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचा तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याची सुरुवात 26 जुलैपासून होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी (India vs Sri Lanka) काही वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
प्रशिक्षक गंभीर आणि हार्दिक पांड्याची नवी सुरुवात
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गंभीरच्या नव्या जबाबदारीची सुरुवात होईल. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली जाऊ शकते. हार्दिक पांड्याला आव्हान असेल ते ऋषभ पंतचं. अपघातातून सावरत तब्बल 14 महिन्यांनी मैदानात कमबॅक करणाऱ्या पंतने टी20 वर्ल्ड कपमध्ये तुफान कामगिरी केली.
वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंना विश्रांती
श्रीलंका दौऱ्यासाठी टी20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती पत्करली आहे. पण एकदिवसीय मालिकेतूनही त्यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहही या मालिकेत खेळणार नाहीए.
या खेळाडूंना मिळणार संधी?
श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेसाठी शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. संघात संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे दोन विकेटकिपर असतील. याशिवाय अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन ऑलराऊंडरला संधी मिळू शकते. तर कुलदीप यादव हा प्रमुख फिरकी गोलंदाज असेल. वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंह, आवेश खान, मोहम्मद सिराज, खलील अहमद आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंच्या हाती असेल.
या खेळाडूंना संधी नाही?
झिम्बाब्वेविरुद्धच्या टीम इंडियात खेळणाऱ्या अभिषेक शर्मा, रियान पराग, तुषार देशपांडेला श्रीलंकेचं तिकिट मिळणं अवघड आहे. 2026 च्या टी20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय टीम इंडियाची नव्याने बांधणी करत असल्याचे हे संकेत आहेत.
श्रीलंकेविरुद्ध संभाव्य भारतीय संघ
शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कप्तान), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद/मुकेश कुमार.