अजय जडेजा रातोरात बनला भारतातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, संपत्तीत विराट कोहलीलाही मागे टाकलं
Ajay Jadeja Net Worth : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली भारतातलाच नाही त संपूर्ण जगातला श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट कोहलीची संपत्ती कोट्यवधी रुपयात आहे. पण आता विराट कोहलीला मागे टाकत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला आहे.
Ajay Jadeja Net Worth : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) गणना जगभरातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत होते. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेरही विराट कोहलीची कमाई सर्वाधिक आहे. जगभरातील टॉप-10 श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचा समावेश झाला असून या यादीत टॉप-10 मध्ये विराट कोहली हा एकमेव क्रिकेटर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएलबरोबरच जाहाराती आणि ब्रँड एन्डोर्समेंटच्या माध्यमातूनही त्याची तगडी कमाई होते. पण आता संपत्तीच्या बाबतीत टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटूने विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अजय जडेजा (Ajay Jadeja) रातोरात कोट्यधीश बनला आहे. दिल्लीत जन्मलेला अजय जडेजा विराट कोहलीला मागे टाकत भारतातला सर्वात श्रीमंत खेळाडू बनला आहे. अजय जडेजाला जामनगरच्या सर्वात श्रीमंत कुटुंबाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहुर्तावर महाराज शत्रुसल्यसिंह जडेजा यांनी शाही सिंहासनाचा वारसदार म्हणून अजय जडेजाची घोषणा केली. महाराज शत्रुसल्यसिंह यांनी 3 फेब्रुवारी 1966 साली वडिलांच्या निधनानंतर राजगादी सांभाळली होती. आता 2024 मध्ये अजय जडेजावर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अजय जडेजा शाही कुटुंबाशी जोडला गेल्याने त्याच्या संपत्तीत कोट्यवधी रुपयांची वाढ झाली आहे. अजय जडेजा टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आहे. आता निवृत्तीनंतर अजय जडेजा समालोचनातून चांगली कमाई करतो. आता शाही कुटुंबाचा वारसदार बनल्यानंतर अजय जडेजाची एकूण संपत्ती ₹1,450 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर विराट कोहलीची एकूण संपत्ती ₹1,000 कोटी रुपये इतकी आहे.
कोण आहे अजय जडेजा?
अजय जडेजाचा जन्म 1971 मध्ये गुजरातच्या जामनगरमध्ये झाला. त्याचा जन्म नवानगरमधल्या एका शाही कुटुंबात झाला. फेब्रुवारी 1992 मध्ये जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य पदार्पण केलं. त्याच वर्षात जडेजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. अजय जडेजा भारतासाठी एकूण 15 कसोटी सामने आणि 196 एकदिवसीय सामने खेळलाय. अजय जडेजा हा फलंदाजीबरोबरच उत्कृष्ट फिल्डर म्हणूनही प्रसिद्ध होता. 1996 एकदिवसीय वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये केलेल्या 45 धावांच्या खेळीसाठी त्याला आजही ओळखलं जातं.
मॅच फिक्सिंगमुळे कारकिर्द संपली
मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर अजय जडेजाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम लागला. बीसीसीआयने 2000 मध्ये जडेजावर आजीवन प्रतिबंध लावला. त्यानंतर बीसीसीआयने बोर्डाने शिक्षेत घट करत पाच वर्षांची केली. 2003 मध्ये शिक्षा संपली, पण यानंतर त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालं नाही. त्यानंतर जडेजाने दिल्ली क्रिकेट संघाचा प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. जडेजाने हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा'मध्येही सहभागी झाला होता. आता जडेजा क्रिकेट कॉमेंट्रेटर म्हणून काम करतो.