रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं
Champions Trophy 2025 : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं. आता टीम इंडियाला वेध लागले आहेत ते आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकण्याचे. पण या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे.
Champions Trophy 2025 Team India : टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकत टीम इंडियाने (Team India) इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. पण जेतेपदानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli), आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. टीम इंडिया आता चॅम्पियन ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) तयारीला लागणार आहे. पण या स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार की नाही याबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी उत्तर दिलं आहे.
रोहित-विराट खेळणार
चॅम्पियन्स ट्ऱॉफी 2025 मध्ये होणार असून पाकिस्तानात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं टार्गेट चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं आहे. ही स्पर्धा एकदिवसीय फॉर्मेटमध्ये असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार की नाही याबाबत अद्यप कोणतीही स्पष्टता नाही. पण पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पर्धेत सीनिअर खेळाडू खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी म्हटलंय, 'टीम इंडियाने आयसीसीची जेतेपद जिंकावीत अशी माझी अपेक्षा आहे. आमच्या कडे चांगला बेंच स्ट्रेंथ आहे. टी20 वर्ल्ड कपमधल्या तीन खेळाडूंचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाची प्रगती पाहात आमचं पुढचे टार्गेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन ट्रॉफी असणार आहे' या दोन्ही स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा टीम इंडियात समावेश असेल असंही जय शाह यांनी स्पष्ट केलंय.
एकदिवसीय-कसोटी सामन्यात खेळणार
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. आता रोहित आणि विराट एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटवर फोकस करणार आहेत. टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्ऱॉफी पाकिस्तानात
यावेळी चॅम्पियन्स ट्ऱॉफीचं पाकिस्तानात आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत 8 संघांचा समावेश असून एकूण 15 सामने खेळले जातील. पण टीम इंडिया पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. चॅम्पियन्स ट्ऱॉफीसाठी हायब्रीड मॉडेलवर विचार सुरु आहे. म्हणजे टीम इंडियाचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाऊ शकतात. यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.