विराट कोहलीचा दिलदारपणा, टीम इंडियातल्या युवा खेळाडूला दिली लकी बॅट गिफ्ट... Photo व्हायरल
Virat Kohli Gifts Bat : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच आपली एक बॅट डावखुरा आक्रमक फलंदाज रिकू सिंगला भेट दिली होती. आता पुन्हा एकदा टीम इंडियातल्या आणखी एका युवा खेळाडूला विराटने आपली लकी बॅट दिली आहे.
Virat Kohli Gifts Bat : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर जितका आक्रमक असतो तितकाच मैदानाबाहेर तो दिलदार आहे. मैदानाबाहेरचे त्याचे अनेक किस्से आहेत. काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने आपली एक बॅट डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला (Rinku Singh) भेट दिली होती. आता पुन्हा एकदा टीम इंडियातल्या आणखी एका युवा खेळाडूला विराटने आपली लकी बॅट गिफ्ट म्हणून दिली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 19 तारखेपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियात वेगवान गोलंदाज म्हणून आकाश दीपला (Aakash Deep) संधी मिळालीय.
विराट कोहलीची लकी बॅट
या मालिकेआधी आकाश दीपला मोठं गिफ्ट मिळालं आहे. विराट कोहलीने आपली लकी बॅट आकाश दीपला गिफ्ट केली आहे. उजव्या हाताचा वेगवागन गोलंदाज आकाश दीपने इन्स्टाग्रामवर याचा फोटो शेअर केला आहे. विराट कोहलीच्या MRF स्टिकर लावलेल्या बॅटचा फोटो आकाशने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत त्याने एक कॅप्शन दिला असून यात त्याने म्हटलंय 'थँक्यू विराटभाई' आकाश दीपने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
विराट कोहलीने आकाशला दिलेली बॅट ही साधारण नाहीए, तर या बॅटने विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी साक्षात विराट कोहलीकडून मिळालेल्या गिफ्टमुळे आकाश दीपचं मनोबल चांगलंच वाढलं आहे.
दुलीप ट्ऱॉफीत आकाश दीपची दमदार कामगिरी
आकाश दीप सध्या दुलीप ट्ऱफीत खेळतोय. शुभमन गिल नेतृत्व करत असलेल्या इंडिया ए संघातून आकाश दीप दमदार कामगिरी करतोय. दुलिप ट्रॉफीतल्या पहिल्याच सामन्यात दोन्ही डावात 9 विकेट घेत आकाश दीपने खळबळ उडवून दिली होती. या कामगिरीमुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये आकाश दीपला संधी मिळण्याची शक्यता आहे.
आकाश दीपने आतापर्यंत खेळलेल्या 32 प्रथम श्रेणी सामन्यात 116 विकेट घेतल्या आहेत. याच वर्षी आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पम केलं होतं. या सामन्यात आकाशने 3 विकेट घेतल्या होत्या.
भारत-बांगलादेश कसोटी मालिका
भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना 19 सप्टेंबरला चेन्नईत तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये रंगणार आहे.