इंग्लंडविरुद्ध जयस्वालची `यशस्वी` खेळी, आयसीसीकडून `या` मानाच्या पुरस्काराने सन्मान
Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंडदरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली. मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याने पटकावला. आता आयसीसीनेही त्याल सन्मानित केलं आहे.
Yashasvi Jaiswal : भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल सद्या चांगलाच चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली. पाच कसोटी सामन्यात यशस्वीने तब्बल 712 धावा केल्या. यात दोन दुहेरी शतकांचा (Double Century) समावेश आहे. याच कामगिरीच्या जोरावर यशस्वी जयस्वालला 'प्लेअर ऑफ द सीरीज'चा (Player of th Series) मानकरी म्हणून घोषित करण्यात आलं. टीम इंडियाचे (Team India) महान फलंदाज सुनील गावसकर यांच्यानंतर पाच कसोटी सामन्यात 700 पेक्षा जास्त धावा करणारा यशस्वी दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. टीम इंडियाचं भविष्य म्हणून यशस्वीकडे पाहिलं जातंय.
आयसीसीने केला सन्मान
भारताच्या या युवा फलंदाजाचा आयसीसीने खास पुरस्कार सन्मान केला आहे. आयसीसीने यशस्वीची 'प्लेअर ऑफ द मंथ' (ICC Player of the Month) म्हणून निवड केली आहे. म्हणजेच आयसीसीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्म फलंदाज म्हणून यशस्वीची निवड झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालने अनेक विक्रम नावावर केले आहेत. एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही यशस्वी जयस्वालच्या नावावर जमा झालाय. जयस्वालने या मालिकेत दोन दुहेरी शतकांबरोबरच तीन अर्धशतकं ठोकलीत.
यशस्वीने दिग्गजांना टाकलं मागे
यशस्वी जयस्वालने या शर्यतीत न्यूझीलंडचा केन विल्यमन्सन आणि श्रीलंकेच्या पाथुम निसांकाला मागे टाकलं. भविष्यातही संघासाठी अशीच चांगली कामगिरी करत पुरस्कार मिळत राहावेत अशी अपेक्षा यशस्वी जयस्वालने व्यक्त केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खूप शिकायला मिळालं, या मालिकेत अनुभव भविष्यातील कारकिर्दीसाठी महत्त्वाचा ठरेल असंही यशस्वीने म्हटलं आहे. 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून यशस्वी जयस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या दौऱ्यात यशस्वीने पहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं होतं.
ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडला
राजकोट आणि विशाखापट्टणम कसोटीत यशस्वीने दुहेरी शतकं केली. ही कामगिरी त्याने वयाच्या 22 व्या वर्षात केली. सलग दोन सामन्यात दोन दुहेरी शतकं करणारा यशस्वी जयस्वालहा तिसरा युवा फलंदाज आहे. याआघी हा विक्रम सर डॉन ब्रॅडमन आणि विनोद कांबळी यांच्या नावावर होता.
यशस्वीची क्रिकेट कारकिर्द
यशस्वी भारतासाठी आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 1028 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 शतकं आणि 4 अर्धशतकं केली आहेत. नाबाद 214 ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे.