Unique Cricket Record : क्रिकेट हा खेळ असा आहे ज्यात नवनवे विक्रम रचले जातात आणि जुने विक्रम मोडले जातात. टी20 क्रिकेटमुळे तर क्रिकेटमध्ये कधी न ऐकलेले विक्रमही रचले गेले आहेत. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलमध्ये धावांचा महापूरच असतो. चौकार-षटकारांची बरसात असते.  वेगवान शतक, तीन चेंडूवर तीन विकेट, सहा चेंडूत सहा षटकार असे अनेक विक्रम आजवर रचले गेले आहेत. पण क्रिकेटच्या इतिहासात एक असा विक्रम रचला गेला आहे जो मोडणं कधीच शक्य होणार नाही. हा विक्रम आहे 1 चेंडूत 286 धावांचा. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण हे शक्य झालंय. क्रिकेटच्या इतिहासात आजही या विक्रमाची नोंद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका चेंडूत 286 धावा
क्रिकेटच्या इतिहासात एका चेंडूत 286 धावांच्या विक्रमाची नोंद आहे. हा विक्रम 130 वर्षांपूर्वी रचला गेला आहे. या विक्रमाने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडवून दिली होती. 1894 मध्ये क्रिकेटच्या एका सामन्यात हा अशक्य विक्रम शक्य झाला होता. फलंदाजांनी एकही षटकार किंवा चौकार न मारता केवळ एका चेंडूवर सवादोनशे धावा केल्या. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार 1894 मध्ये लंडनमध्ये छापलं जाणार वृत्तपत्र 'पाल-माल गजट' मध्ये यासंबंधीचं वृत्त छापण्यात आलं होतं. 


काय घडलं होतं मैदानावर?
1894 मध्ये झालेला तो क्रिकेटचा सामना कॅमेरात कैद झालेला नाही. त्यावेळी आजच्या इतकं तंत्रज्ञान नव्हतं. पण या अनोख्या सामन्याची बातमी वृत्तपत्रात छापून आली होती. या बातमीचं हेडलाईनचं 1 चेंडूत 286 धावा असं होतं. 15 जानेवारी 1894 मध्ये ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरिया आणि स्क्रॅच XI या नावाच्या दोन संघात मुकाबला रंगला होता. बॉनबरी स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात आला. व्हिक्टोरियाची पहिल्यांदा फलंदाजी होती. मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या एका फलंदाजाने एक जोराचा फटका मारला आणि चेंडू झाडावर जाऊन अडकला. 


फलंदाज 6 किमी धावले
चेंडू झाडावर अडकताच फलंदाजांनी धावा घ्यायला सुरुवात केली. झाडावर अडकलेला चेंडू काढण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु होते, पण चेंडू काही केल्या खाली पडत नव्हता. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अंपायर्सकडे चेंडू हरवल्याची घोषणा करण्याची विनंती केली. पण अंपायर्सने ही विनंती फेटाळली. तोपर्यंत फलंदाज धावा घेतच होते. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार झाड कापण्याचा निर्णय घेण्यात आला, पण कुऱ्हाड सापडली नाही. अनेक तासांनंतर रायफलने अचूक नेम साधत चेंडू झाडावरुन खाली पाडण्यात यश आलं. पण तोपर्यंत फलंदाजांनी तब्बल 286 धावा पळून काढल्या होत्या. रिपोर्टनुसार फलंदाज तब्बल 6 किलोमीटर धावले होते. 


क्रिकेटच्या इतिहासात आज देखील या घटनेचा उल्लेख होतो. त्यावेळी क्रिकेटमध्ये कोणतेही नियम नसल्याने हे शक्य झालं होतं.