ICC U-19 Women`s World Cup: हमारी छोरियां छोरो से कम है के! वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी
अंडर-19 वुमन्स वर्ल्ड कपचं आयसीसीकडून पहिल्यांदाच आयोजन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकनेही केलं कौतुक
ICC U-19 Women's World Cup: आयसीसी (ICC) एकोणवीस वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC U-19 Women's World Cup) टीम इंडियाने (Team India) दमदार सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा सात विकेटने धुव्वा उडवला (India Beat South Africa). टीम इंडियाच्या विजयात कर्णधार शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि सलामीची फलंदाज श्वेता सेहरावतने (Shweta Sehrawat) मोलाची भूमिका बजावली. टीम इंडिया ग्रुप डीमध्ये समावेश असून दुसरा सामना 16 जानेवारीला यूएईविरुद्ध (India vs UAE) रंगणार आहे. (under 19 woman world cup india beat sourth africa)
टीम इंडियाची दमदार सुरुवात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानचा पाठलाग करताना शेफाली आणि श्वेताने धमाकेदार सुरुवात केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी सात षटकात 77 धावांची पार्टनरशिप केली. कर्णधार शेफालीने अवघ्या 16 चेंडूत 45 धावा केल्या. यात 9 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेच्या मियाने स्मिटने शेफालीला बाद केलं. शेफाली बाद झाल्यानतंर श्वेताने एक बाजू भक्कम सांभाळली.
श्वेता सेहरावतने जी. तृषा आणि सौम्या तिवारीबरोबर पार्टनरशिप करत भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. श्वेताने 57 चेंडू 92 धावा केल्या. यात तब्बल 20 चौकार तीने लगावले. त्याआधी टॉस जिंकून यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिली फलंदाजी घेतली. दक्षिण आफ्रिकेने पाच विकेट गमावत 166 धावा केल्या. सलामीला आलेल्या सिमोन लॉरेन्सने 44 चेंडूत 61 धावा केल्या तर के मॅसोने 19 आणि मियानो स्मिटने 16 धावा केल्या. भारतातर्फे कर्णधार शेफालीने 2 विकेट घेतल्या.
सचिनने केलं आयसीसीचं कौतुक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 19 वर्षाखालील मुलींची वर्ल्ड कप स्पर्धा केल्याच्या आयसीसीच्या (ICC) निर्णयाचं कौतुक केलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघात सर्वोत्तम होण्याची क्षमता आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये अनुभवी खेळाडू आणि काही तरुण प्रतिभावान खेळाडूंचा संघात चांगला समतोल आहे. पहिल्यांदाच 19 वर्षाखालील मुलींची वर्ल्ड कप स्पर्धा होतेय. हा क्रिकेटमध्ये मोठा बदल असल्याचं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
गेल्या काही काळात महिला क्रिकेटने बरीच प्रगती केली आहे, असंही तेंडुलकरने म्हटलं आहे. अंडर-19 महिला विश्वचषक 2023 मध्ये 16 संघ सहभागी झाले असून एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत.