IND vs ENG 5th Test: धर्मशाला कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jailwal) 1 धाव बनवताच विराट कोहलीचा (Virat Kohli) 7 वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला. इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर  होता. कोहलीने 2016-17 मधल्या कसोटी मालिकेत 655 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी हा विक्रमरचला. तर यशस्वी जयस्वालने पदार्पणाच्या अवघ्या सात महिन्यातच कोहलीचा विक्रम मोडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशस्वी  जयस्वाल टॉपवर
धर्मशाला कसोटीत (Dharamshala Test) यशस्वी जयस्वालने पहिल्या 3 चेंडूत 1 धाव करत कोहलीचा विक्रम मोडला. एका कसोटी मालिकेत सर्वाधिक 655 धावा करणारा विराट कोहली हा भारताचा एकमेव फलंदाज होता. आता हा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर झाला आहे. यशस्वी जयस्वालने मालिकेतील पाच कसोटी सामन्यात तब्बल 712 धावा केल्या आहेत. यात 2 शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 214 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण मालिकेत यशस्वीच्या आसपासही कोणी नाही.


या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा जॅक क्राऊली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 407 धावा केल्या. तर टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिलने 351 धावा केल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


यशस्वी जयस्वालने अवघ्या 8 कसोटी सामन्यात 971 धावा केल्या आहेत. यात तीन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय यशस्वीने 17 टी20 सामन्यात 502 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. 


218 धावांवर इंग्लंड ऑलआऊट
धर्मशाला कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्य घेतला. पण टीम इंडियाच्या फिरकीसमोर त्यांच्या संपूर्ण संघ 218 धावांवर ऑलआऊट झाला. कुलदीप यादवने सर्वाधिक 5 तर रविचंद्रन अश्विनने 4 विकेट घेतल्या. इंग्लंडच्या सुरुवातीच्या पहिल्या चार प्रमुख फलंदाजांना कुलदीप यादवने पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. इंग्लंडतर्फे जॅक क्राऊलीने सर्वाधिक 79 धावा केल्या. रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. 


कुलदीप यादवची अनोखी हाफसेंच्युरी
टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या नावावर या कसोटीत अनोखी हाफसेंच्युरीची नोंद झाली. कुलदीप यादवने बेन स्टोक्स, बेन डकेट, ओली पोप, जॉनी बेअरस्टो आणि जॅक क्राऊलीची विकेट घेतली. याबरोबरच त्याने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत 50 विकेटचा टप्पा पूर्ण केला.