VIDEO : वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुन्रोचे १८ चेंडूत अर्धशतक
क्रिकेटमध्ये २०१८ची सुरुवात धमाकेदरा झालीये. वर्षाच्या पहिल्याच दिवशी टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन मुन्रोने वेस्ट इंडिजविरुद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकले.
नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये २०१८ची सुरुवात धमाकेदरा झालीये. वर्षाच्या पहिल्याच दिवशी टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन मुन्रोने वेस्ट इंडिजविरुद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकले.
मुन्रोने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सहावे सर्वात जलद अर्धशतक ठोकले. याआधी मुन्रोने १४ चेंडूत अर्धशतक ठोकण्याची किमया साधली होती.
वेस्ट इंडिजने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाला पहिले यश मार्टिन गप्टिलच्या रुपात मिळाले. मात्र त्यानंतर कॉलिन मुन्रोने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच पिसे काढली. मुन्रोने १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. याआधी १४ चेंडूत त्याने अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली होती.
मुन्रोने या सामन्यात विंडीजच्या फलंदाजांची धुलाई केली. खासकरुन क्रेग ब्राथवेट आणि कोक विल्यम्स यांना फलंदाजांनी धुतले. मुन्रोने ब्राथवेटच्या एका ओव्हरमध्ये २१ धावा तर विल्यम्सच्या एका ओव्हरमध्ये २४ धावा ठोकल्या. अखेर २३ चेंडूत ६६ धावा करत विल्यम्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. या डावात त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले.
जानेवारीशी मुन्रोचे खास नाते
कॉलिन मुन्रो आणि जानेवारीचे खास नाते आहे. हे सलग तिसरे वर्ष आहे ज्यात जानेवारीमध्ये मुन्रोची बॅट तळपली. त्याने याआधी १० जानेवारी २०१६मध्ये श्रीलंकेविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
६ जानेवारी २०१७मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध ५४ चेंडूत १०१ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता १ जानेवारी २०१८मध्ये त्याने १८ चेंडूत वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक ठोकले.
वर्षातील पहिले अर्धशतक, पहिला चौकार आणि षटकार
कॉलिन मुन्रोने या अर्धशतकासह वर्षातील पहिले अर्धशतक झळकावण्याचा मान आपल्या नावे केला. याशिवाय त्याने वर्षातील पहिला चौकार आणि षटकार ठोकण्याचा मानही मिळवला.