ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झालं होतं वडिलांचं निधन, भारतात येताच कब्रिस्तानमध्ये गेला सिराज
भारतात परतल्यानंतर त्याने प्रथम वडिलांच्या कबरवर जावून त्यांचं दर्शन घेतलं.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी बजावली. भारताच्या कसोटी मालिकेतील विजयात त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. ऑस्ट्रेलिया दौर्यावर सिराजने कसोटी सामन्यात पदार्पण केले. सिराजने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले परंतु तो खेळताना त्याला ते पाहू शकले नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिराजच्या वडिलांचं निधन झालं होतं. भारतात परतल्यानंतर त्याने प्रथम वडिलांच्या कबरवर जावून त्यांचं दर्शन घेतलं.
भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौर्यावरुन गुरुवारी भारतात परतले आहेत. एका वाहिनीशी बोलताना सिराज म्हणाला की, "मी थेट घरी गेलो नाही, मी थेट विमानतळावरून स्मशानभूमीवर गेलो. तिथे मी माझ्या वडिलांच्या कबरीजवळ थोड्या वेळासाठी बसलो. मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही पण कबरवर फुले घेऊन आलो."
इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर भारतीय संघ थेट दुबईहून ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला. ऑस्ट्रेलियामध्ये पोहचल्यानंतर सिराजला त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली. तो बायो बबलमध्ये होता, म्हणून तो ते तोडून भारतात परत येऊ शकला नाही. त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने भारतासाठी सामना खेळला पाहिजे, म्हणूनच बीसीसीआयने त्याला मायदेशी परतण्याचा पर्याय दिल्यानंतरही तो मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्येच राहिला.
सिराज म्हणाला की वडिलांच्या कबरीवर बराच वेळ बसून राहिल्यानंतर तो घरी परतला, "जेव्हा मी आईला भेटलो तेव्हा ती रडू लागली. त्यानंतर मी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि सांत्वन केले.' हा खूप कठीण काळ होता. महिन्यांनंतर त्यांचा मुलगा घरी परतला आहे. आई नेहमी माझ्या घरी येण्याची वाट पाहत होती.