Crime News : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेल (Munaf Patel) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (UP RERA) मुनाफ पटेलची दोन बॅंक खात्यांवर जप्ती आणत 52 लाख रुपयांची वसूली केली आहे. ग्रेटर नोएडा जिल्हा प्रशासनाने रिकव्हरी सर्टिफिकेटद्वारे (आरसी) ही वसूली केली आहे. मुनाफ पटेल हा 'निवास प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड' या बिल्डर कंपनीचा संचालक आहे. मुनाफ पटेल यांच्या कंपनीमार्फत गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश रेराने ही कारवाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश रेरा अधिकाऱ्यांनी बजावलेल्या आरसीद्वारे कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मुनाफ पटेलही त्या कंपनीत संचालक आहेत. कायदेशीर सल्ल्यानंतर वसूली पथकाने बँक खाते जप्त करून पैसे जप्त केले आहेत, अशी माहिती गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास एलवाय यांनी दिली. अद्यापही ही कारवाई सुरु आहे.


नेमकं काय घडलं?


निवास प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचा सेक्टर-10 ग्रेनो वेस्टमधील वनलीफ ट्रॉय हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी यूपी रेराकडे तक्रार केली. तक्रारीनंतर, यूपी रेराने बिल्डरविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. मात्र त्यानंतर कोणतीही भरपाई न झाल्याने यूपी रेराने रिकव्हरी सर्टिफिकेट जारी केले. या बिल्डरविरुद्ध जिल्हा प्रशासनाने 10 कोटींपेक्षा अधिकचे 40 पेक्षा जास्त रिकव्हरी सर्टिफिकेट जारी केले होते. प्रशासनाकडून वसुलीचे प्रयत्न सुरु आहेत मात्र बांधकाम व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर कायदेशीर सल्लामसलत करुन प्रशासनाने संचालकांकडून पैसे वसूली करण्यास सुरुवात केली. 


याच कंपनीत मुनाफ पटेल हा संचालक आहे त्यामुळे त्याच्यावरही कारवाई झाली आहे. नोएडा आणि गुजरातमधील अॅक्सिस बँकेच्या दोन शाखांमध्ये त्याची खाती आहेत. दोन्ही खात्यांवर जप्ती आणली त्यामधून सुमारे 52 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. यापुढेही बिल्डरवर वसुलीची कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


दरम्यान यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नावही आम्रपाली ग्रुपसोबत जोडले गेले होते. महेंद्रसिंह धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. त्याने या ग्रुपसाठी अनेक जाहीरातींचे शूटिंग केले होते. 2016 मध्ये ग्राहकांनी आम्रपाली ग्रुपच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर धोनीने आम्रपाली ग्रुपसोबतचे सर्व व्यवहार बंद केले होते. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहे. त्यानंतर आता मुनाफ पटेलचे नाव बिल्डरशी जोडले गेले आहे. याशिवाय अनेक अभिनेते आणि खेळाडू अशा वादात सापडले आहेत