युजवेंद्र चहल रोबोट नाही, मुरलीधरनकडून पाठराखण
चहलचा फॉर्म पाहता अनेकांनीच त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : भारतीय फलंदाजांसमोर जिथे शेन वॉर्नसारख्या फिरकी गोलंदाजांनाही फारसा तग धरता आला नाही, अशा खेळाडूंना तंबूत पाठवण्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अॅडम झॅम्पा मात्र चांगलाच यशस्वी ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच आतापर्यंत झॅम्पाची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळत आहे. त्याने या मालिकेत आतापर्यंत दोन वेळा धोनीची तर, एकदा विराट कोहलीची विकेटही घेतली आहे. त्यामुळे अर्थातच त्याचं मनोधैर्य उंचावलेलं आहे. फिरकी गोलंदाजांच्या गोलंदाजीचा मारा परतवून लावणाऱ्या धोनी आणि विराटला बाद करणारा झॅम्पा क्रीडा विश्वात बराच चर्चेत आला आहे. उलटपक्षी भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज युजवेंद्र चहल मात्र त्याचा फॉर्म टीकवण्याचा कसून प्रयत्न करत आहे.
सध्याच्या घडीला झॅम्पाचा फॉर्म पाहता अनेकांनीच चहल आणि त्याच्यामध्ये तुलना करण्यास सुरुवात केली आहे. मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात चहलच्या गोलंदाजीला मिळालेलं उत्तर आणि १० षटकांमध्ये त्याने दिलेल्या ८० धावा, त्या बदल्यात घेतलेली अवघी एक विकेट या साऱ्यामुळे त्याच्यावर काही अंशी टीकाही झाली. पण, श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील माजी गोलंदाज, फिरकीपटू मुथ्थैया मुरलीधरन याने मात्र चहल हा एक उत्तम खेळाडू असल्याचं म्हणत त्याची पाठराखण केली आहे. चहल हा एक मनुष्य असून तो काही यंत्रमानव (रोबोट) नाही, असे खडे बोल त्याने सुनावले आहेत.
काय म्हणाला मुरलीधरन?
आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्याने याविषयी आपलं मत मांडलं. 'एखादा खेळाडू जेव्हा जेव्हा सामना खेळेल तेव्हा प्रत्येक वेळी तो पाच गडी बाद करेल अशी अपेक्षाच तुम्ही ठेवू शकत नाही. तो (चहल) एक सर्वोत्तम खेळाडू आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून तो उत्तम गोलंदाजी करत आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये नाविन्य आहे. सोबतच तो विरोधी संघातील फलंदाजाला अडचणीतही आणतो. आता फक्त एकाच सामन्यात त्याची गोलंदाजी अपयशी ठरली आहे. विश्वास ठेवा तो काही कोणी यंत्रमानव नाही. एखाद्या खेळाडूने चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं यासाठी तुम्ही त्याच्यावर दबाव टाकू शकत नाही', असं मुरलीधरन म्हणाला.
चहलकडे खेळासाठी गरजेची असणारी सर्व कौशल्य आहेत जी त्याने वेळोवेळी सिद्ध करुन दाखवली आहेत, असं म्हणत भारतीय क्रिकेट संघातील माजी फिरकी गोलंदाज ईरापल्ली प्रसन्ना यांनी मुरलीधरनच्या वक्तव्याला दुजोरा दिला. त्यामुळे एका अर्थी माजी क्रिकेटपटूनची फळी चहलला या कठिण प्रसंगात साथ देत आहे हेच चित्र स्पष्ट होत आहे.