PHOTO : नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी `विरुष्का` रवाना
अनुष्काच्या साथीने विराट `या` ठिकाणी करणार नव्या वर्षाचं स्वागत
मुंबई : मेलबर्न येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघावर मात केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने खऱ्या अर्थाने वर्षाचा शेवटही दणक्यात केला असंच म्हणावं लागेल. संघावर विश्वास ठेवत त्यांच्या कामगिरीकडे मोठ्या अभिमानाने पाहणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने याच उत्साही वातवरणात २०१८ या वर्षाचा शेवट करण्याचं ठरवलं आहे.
बऱ्याच घडामोडींच्या या वर्षाच्या शेवटी विराटला साथ देत आहे ती म्हणजे त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा. आपल्या पत्नीच्याच साथीवे विराट नव्या वर्षात पदार्पण करणार असून, पुढील कसोटी सामन्यासाठी तो सिडनीला रवाना झाला आहे. अनुष्काही आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत काही खास क्षण व्यतीत करण्यासाठी सातासमुद्रापार पोहोचली आहे.
विराटनेट २०१८ मधील शेवटच्या विमान प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये अनुष्का एखाद्या लहान मुलाप्रमाणे तिचा चेहरा लपवताना दिसत आहे. नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही जोडी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. यावेळीही त्यांच्याविषयीच्या चर्चा रंगण्यास निमित्त आहे ते म्हणजे सरत्या वर्षाचं... नव्या संधीचं आणि अनुष्का विराटच्या साथीचं....
सिडनीमध्ये नव्या वर्षाचं स्वागत केल्यानंतर विराट भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या साथीने बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरेल. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत सध्या भारताकडे २-१ अशी आघाडी आहे. त्यामुळे चौथा सामना जिंकत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिकण्याची किमया कर्णधार विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघ करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.