Hardik Pandya : टी20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावल्यानंतर वादळामुळे बारबाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया (Team India) लवकरच मायदेशी दाखल होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. या विजयानंतर टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव झालाय. आयसीसीने विजेत्या संघाला 20 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं. तर बीसीसीआयने टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने म्हणजे आयसीसीने टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मोठं गिफ्ट दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याला मोठं गिफ्ट
आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये केलेल्या दमदार कामगिरिमुळे हार्दिक पांड्याने आयसीसी टी20 ऑलराऊंडर क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसीने ताजी टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यात हार्दिक पांड्या पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी करणाऱ्या हेन्रिक क्लासेनची विकेट घेत भारताच्या विजयाचा मार्ग सोपा केला होता. तर सामन्याच्या शेवटच्या षटकात हार्दिकच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल टिपत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं .


नंबर-1 ऑलराऊंडर
टी20 वर्ल्ड कपमधल्या दमदार कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला दोन स्थानांचा फायदा झाला. आता तो श्रीलंकेचा वानिंदु हसरंगाबरोबर संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीत मोलाची भूमिका बजावली आहे. टी20 ऑलराऊंडर क्रमवारी नंबर-1 गाठणारा हार्दिक पांड्या हा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याने 150 च्या स्ट्राईक रेटने 144 धावा केल्या. तर 11 विकेटही घेतल्या. 


अक्षरलाही 7 स्थानांचा फायदा
टी20 ऑलराऊंडरच्या क्रमवारीत टॉप 10 मध्येही मोठे बदल झाले आहेत. मार्कस स्टॉईनिस, सिकंदर रजा, शाकिब अल हसन आणि लियाम लिविंग स्टोन यांना एक स्थानाचा फायदा झाला आह. तर बांगलादेशचा ऑलराऊंडर मोहम्मद नबीला पाच स्थानांचं नुकसान झालं असून तो टॉप 5 च्या बाहेर फेकला गेला आहे. भारतीय ऑलराऊंडर अक्षर पटेलला सात स्थानांचा फायदा झाला आहे. अक्षर ऑलराऊंडर क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कुलदीप यादवने आयसीसी गोलंदाजी क्रमवारीत टॉप 10 मध्ये एन्ट्री केली आहे. कुलदीप आता आठव्या क्रमांकावर आहे. तर जसप्रीत बुमराह बाराव्या क्रमांकावर आहे.