मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुलीची आई तिला ओरडत आणि मारत पाढे शिकवत आहे. तर मुलगी घाबरलेली आणि रडताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ क्रिकेटर विराट कोहली, शिखर धवन आणि युवराज सिंह यांनी शेअर करत आईच्या शिकवण्याच्या पद्धतीवर जोरदार टीका केली. पालकांनी मुलांना प्रेमाने शिकवण्याचं आवाहन त्यांनी केलं.


मात्र व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या मुलीचं बॉलिवूड कनेक्शन आहे. ही चिमुकली गायक-संगीतकार तोशी आणि शारीब साबरीची भाची आहे. हया असं या मुलीचं नाव असून ती तोशीच्या बहिणीची मुलगी आहे. आता या दोघांनी व्हिडीओसंदर्भात भाष्य केलं आहे. एका मिनिटाच्या क्लिपवरुन मुलीच्या आईबद्दल मत बनवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.


तोशी म्हणाला की, “माझ्या बहिणीने हयाला शिकवताना हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. फॅमिलीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा व्हिडीओ पाठवून हया किती खट्याळ आणि मस्तीखोर झालीय हे सांगता येईल, असा उद्देश या व्हिडीओमागचा होता.विराट कोहली आणि शिखर धवन यांना आमच्याबद्दल काही माहित नाही. आमचं मूल कसं आहे, हे आम्हाला माहित आहे ना. तिचा स्वभावच तसा आहे. पुढच्याच क्षणात ती खेळायला निघून जाते. जर तुम्ही तिला सोडलं तर ती म्हणणार की मी थट्टा करत होते. तिच्या स्वभावामुळे तिला सूट दिली तर की अभ्यासही करु शकणार नाही.


हया अतिशय हट्टी आणि कुटुंबाची लाडकी आहे. पण तिचा हट्ट आणि आमच्या लाडामुळे तिला सूट दिली तर ती अभ्यास कसा करणार? जेव्हा अभ्यासाचा मुद्दा असतो तेव्हा कधीतरी मुलांच्या नखऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं बरं, असंही तोशी साबरी म्हणाला.