दुबई : आयपीएलच्या १३व्या मोसमाला सुरुवात व्हायला आता फक्त काही तासांचा अवधी आहे. मुंबई आणि चेन्नईच्या टीममध्ये पहिला सामना होणार आहे. त्याआधी प्रत्येक टीम आपली रणनिती आखत आहे. चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्यांचा कर्णधार धोनीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. धोनी १४ महिन्यानंतर मैदानात पुनरागमन करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएस धोनी २०१९ वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शेवटचा खेळला होता. यानंतर १४ महिन्यांनी धोनी पुन्हा मैदानात दिसेल. १५ ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. मागच्या १४ महिन्यांची विश्रांती धोनीसाठी फायद्याची राहिली, असं स्टीफन फ्लेमिंग म्हणाले. 


या विश्रांतीमुळे धोनी जास्त फिट, तसंच मानसिकदृष्ट्या मजबूत आणि ताजातवाना दिसत आहे. याचा फायदा त्याच्या बॅटिंग आणि नेतृत्वात होईल, असा विश्वास फ्लेमिंग यांनी व्यक्त केला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला असला, तरी त्याचात काहीही बदलेलं नाही. आधीसारखाच धोनी नेटमध्ये बॅटिंग आणि कीपिंगचा सराव करत आहे. 


चेन्नईच्या टीममध्ये वयस्कर खेळाडू


चेन्नईच्या टीममध्ये असलेल्या वयस्कर खेळाडूंबाबत नेहमीच प्रश्न विचारले जातात. फ्लेमिंग यांनी या प्रश्नाचं उत्तरही दिलं आहे. टीममधले बहुतेक खेळााडू ३५ वर्षांच्या पुढचे आहेत. पण आमच्यासाठी हे फायद्याचं आहे, कारण या वरिष्ठ खेळाडूंचा अनुभव खूप जास्त आहे. मागच्या मोसमात याच खेळाडूंनी टीकाकारांना त्यांच्या कामगिरीतून चोख प्रत्युत्तर दिलं होतं. हे खेळाडू कोणत्याही परिस्थितीमध्ये दबाव झेलू शकतात. धोनी, वॉटसन, केदार जाधव आणि इम्रान ताहीर हे खेळाडू एकट्याच्या जीवावर मॅच जिंकवून देऊ शकतात, असं फ्लेमिंग म्हणाले.