चेन्नई : २३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा आयपीएलची ओपनिंग सेरेमनी होणार नाही. या ओपनिंग सेरेमनीसाठी होणाऱ्या खर्चाचे पैसे पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहेत. याचबरोबर आता चेन्नईची टीमही या शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत करणार आहे. चेन्नईची टीम त्यांच्या पहिल्या सामन्याची कमाई शहिद कुटुंबाला देणार आहे. चेन्नई टीमच्या डायरेक्टरनी ही माहिती सांगितली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ मार्चला चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात विक्री झालेल्या तिकीटांची कमाई शहिदांच्या कुटुंबाला देण्यात येईल, असं चेन्नई टीमचे डायरेक्टर राकेश सिंग म्हणाले. आमचा कर्णधार धोनीला लष्करानं लेफ्टनंट कर्नलची पदवी दिली आहे. त्याच्या हस्तेच शहिदांच्या कुटुंबाला चेक देण्यात येतील, असं वक्तव्य राकेश सिंग यांनी केलं.


चेन्नई आणि बंगळुरूच्या मॅचची तिकीटं बूकिंग सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासांमध्येच विकली गेली.


पंजाबच्या टीमचीही मदत


पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यापैकी ५ शहीद जवान हे हिमाचल आणि पंजाबमधील होते. या भागातील शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.


पंजाब टीमचा कर्णधार रविचंद्रन आश्विन आणि सीआरपीएफचे उप महानिरीक्षक वीके कौंदल यांच्या उपस्थितीत शहीद जवानांच्या कुटुंबियांना धनादेश सुपूर्त करण्यात आले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात जयमल सिंह, सुखजिंदर सिंह, मनिंदर सिंह, कुलविंदर सिंह आणि तिलक राज या जवानांना वीरमरण आले होते. हे शहिद जवान पंजाब-हरियाणा राज्यातले आहेत.


बीसीसीआयचीही मदत


याआधी बीसीसीआयच्या वतीने शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सैन्य दलाच्या सहाय्यता निधी आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या सहाय्यता निधीसाठी २० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या पहिल्याच्य दिवशी म्हणजेच २३ मार्चला भारतीय सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे. यांच्या उपस्थितीत ही रक्कम देण्यात येणार आहे.


बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे उद्घाटन थाटात न करता, ही रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना देण्याचं ठरवलं आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचे चहुबाजूंनी स्वागत केले गेले. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २३ तारखेपासून सुरुवात होत असून पहिली मॅच गतविजेती चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात खेळली जाणार आहे. प्रशासकीय समितीने सेना सहाय्यता निधीसाठी २० कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. 


भारतीय खेळाडूंचीही मदत 


ऑस्ट्रेलियाविरुद्ध रांचीमध्ये झालेल्या मॅचवेळी भारतीय टीमच्या प्रत्येक खेळाडूने त्यांच्या या मॅचची कमाई शहिदांच्या कुटुंबाला दिली होती.