CSK vs GT IPL Qualifier-1: आज चेन्नई-गुजरात Qualifier मध्ये भिडणार; टॉसच ठरणार निर्णयाक कारण...
CSK vs GT IPL 2023 Qualifier 1: पॉइण्ट्स टेबलमध्ये 14 पैकी 10 सामने जिंकलेला गुजरातचा संघ पहिल्या स्थानी राहिला तर चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी असल्याने या दोन्ही संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे.
CSK vs GT IPL 2023 Qualifier 1: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2023 च्या पर्वातील पहिला क्वालिफायरचा सामना (Qualifier 1) आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसदरम्यान (Chennai Super Kings V Gujarat Titans) होणार आहे. चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या अतीमहत्त्वच्या सामन्याचा टॉसच महत्त्वाचा ठरणार आहे. 70 सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर असल्याने हे 2 संघ क्वालिफायरचा पहिला सामना खेळणार आहेत.
चेन्नईच्या घरच्या मैदानावर सामना
विद्यमान विजेत्या गुजरातचा संघ आपली दमदार कामगिरी कायम ठेवण्याच्या उद्देशानेच कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. साखळी फेरीमध्ये गुजरातने आपल्या 14 पैकी 10 सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने संघ अधिक आत्मविश्वासाने खेळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या चेन्नईच्या संघाला लय गवसली असून ते सुद्धा 5 व्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरतील. मागील वर्षी चेन्नईच्या संघाला नावाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. यंदा घरच्या मैदानामध्ये क्वालिफायर खेळताना चेन्नईच्या संघाकडे नक्कीच अॅडव्हानटेज असेल यात शंका नाही.
...म्हणून टॉस महत्त्वाचा
चेपॉकच्या मैदानावर यंदाच्या पर्वामध्ये एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. या मैदानावर दुसऱ्या डावात दव पडतं असा अनुभव आहे. त्यामुळेच नाणेफेक जिंकणारा संघ प्रतिस्पर्धाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करेल अशी दाट शक्यता आहे. दव पडत असल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजांना गोलंदाजी करताना अडचणी निर्माण होतात. म्हणूनच धावांचा पाठलाग करणं या मैदानावर अधिक फायद्याचं मानलं जातं. यंदाच्या पर्वातील 7 सामन्यांपैकी 4 सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
गुजरातचं पारडं जड
वन टू वन सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास गुजरातचा आतापर्यंतचा चेन्नईविरुद्धचा रेकॉर्ड फारच दमदार आहे. दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात 3 सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने हार्दिकच्या नेतृत्वाखालील गुजरातनेच जिंकले आहेत. त्यामुळेच चेन्नईला चौथ्यांदा पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर नाव कोरण्याच्या दृष्टीने स्पर्धेचा अंतिम सामना गाठण्याच्या हार्दिक अॅण्ड कंपनीचा मानस असेल.
हार्दिक काय करणार?
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने मागील 3 सामन्यांमध्ये गोलंदाजी केलेली नाही. त्याने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीही केली नव्हती. त्यामुळेच क्वालिफायरच्या सामन्यात हार्दिक गोलंदाजी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2023 च्या पर्वाच्या सुरुवातीला हार्दिक नव्या चेंडूने गोलंदाजी करायचा. मागील 3 सामन्यांपासून हार्दिकने गोलंदाजी केलेली नाही. दुसरीकडे गुजरातच्या यश दयाल आणि मोहित शर्मा यांनी मागील सामन्यात त्यांच्या 8 ओव्हरमध्ये तब्बल 93 धावा दिल्या होत्या. त्यामुळेच या सामन्यात पंड्या आपल्या गोलंदाजीने प्रभाव पाडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे गुजरातच्या गोलंदाजांच्या यादीत जोशुआ लिटिलच्या रुपाने नवीन सहकारी सहभागी झाला आहे. त्यामुळे त्याला या सामन्यात संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा सामना आज सायंकाळी साडेसात वाजल्यापासून लाइव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे. सामना स्टार नेटवर्क आणि जिओ टीव्हीवर पाहता येणार आहे.