CWG 2022 : भारतीय बॉक्सरचा गोल्डन पंच, भारताच्या खात्यात आणखी दोन सुवर्णपदके
बॅटमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनेही कॉमनवेल्थ स्पर्धेत आपलं पदक निश्चित केलं आहे
CWG 2022 : कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत भारताची पदकांची लूट सुरुच आहे. रविवारी भारताला बॉक्सिंगमध्ये आणखी दोन सुवर्णपदके मिळाली आहेत. अमित पंघलने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने भारताला 15 वे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच्या आधी बॉक्सर नीतू हिनेही सुवर्णपदक जिंकले आहे. पंघलने कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकले आहे. यापूर्वी त्याने गोल्ड कोस्ट 2018 मध्ये रौप्य पदक जिंकले होते.
भारतीय बॉक्सर अमित पंघल आणि नीतू घनघास यांनी आपापल्या अंतिम फेरीत विजय मिळवून बॉक्सिंगचे सुवर्णपदक जिंकले. अमित पंघलने पुरुषांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या केरेन मॅकडोनाल्डचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
दुसरीकडे नीतू घंगासने महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत यजमान इंग्लंडच्या बॉक्सर डेमी जेडचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
दरम्यान, बॅटमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनेही कॉमनवेल्थ स्पर्धेत आपलं पदक निश्चित केलं आहे. पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत सिंगापूरच्या जिया मिनचा पराभव केला.
भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले
भारतीय महिला हॉकी संघाने कॉमनवेल्थ स्पर्धेत प्रथमच कांस्यपदक जिंकले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय संघाने न्यूझीलंडचा शूटआऊटमध्ये पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी शूटआऊटमध्ये गतविजेत्या न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले.
भारताचा मुख्य सामना न्यूझीलंडशी 1-1 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे सामन्याचा निकाल शूटआऊटद्वारे लागला, ज्यामध्ये भारताचा विजय झाला. भारताने शूटआउट 2-1 ने जिंकला आणि यासह कॉमनवेल्थ स्पर्धेत तिसऱ्यांदा पदक जिंकले.