CWG: कॉमनवेल्थमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान महिला संघ, पाहा कधी होणार सामना?
महिला क्रिकेट टी-20 फॉरमॅटमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणार आहे.
मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या महिला क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताचा महिला संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. फायनल 7 ऑगस्टला होणार आहे. आयोजकांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
महिला क्रिकेट टी-20 फॉरमॅटमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणार आहे. 1998 मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शेवटचा क्रिकेट खेळला गेला होता.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) एका निवेदनात म्हटले आहे की, 'महिला क्रिकेट स्पर्धा 29 जुलैपासून एजबॅस्टन येथे होणार आहे. कांस्यपदक आणि सुवर्णपदकाचे सामने 7 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 जुलै रोजी सलामीच्या सत्रात पहिला सामना खेळला जाईल, त्यानंतर पाकिस्तानचा सामना बार्बाडोसशी होणार आहे. जे नुकतेच वेस्ट इंडिजचा सहभागी संघ म्हणून निश्चित झाला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 31 जुलै रोजी होणार आहे. 3 ऑगस्टला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. यजमान इंग्लंड 30 जुलै रोजी पात्रता फेरीतील पहिला सामना खेळणार आहे. 2022 च्या सुरुवातीला पात्रता सामने खेळवले जातील.
त्यानंतर इंग्लंडचा संघ 2 ऑगस्टला दक्षिण आफ्रिकेशी आणि 4 ऑगस्टला न्यूझीलंडशी भिडणार आहे. नेटबॉलचे वेळापत्रकही शुक्रवारीच जाहीर करण्यात आले.