मुंबई : अभिनेता सलमान खान salman khan हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्येच पूर्णत: गुंग झाला आहे. 'दबंग' या अतिशय गाजलेल्या चित्रपटाचा तिसरा भाग, म्हणजेच 'दबंग ३' Dabangg 3 प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. त्याच निमित्ताने या चित्रपटातून पुन्हा एकदा चुलबूल पांडेच्या रुपात झळकणारा सलमानही सध्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अशाच एका कार्यक्रमात त्याने नुकतीच हजेरी लावली. जेथे त्याने क्रिकेट या खेळाली असणारं त्याचं नातं सर्वांसमोर उलगडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटपटू केदार जाधव याच्याशी असणारी आपली चांगली ओळख आणि महेंद्रसिंह धोनी या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराचं आपल्यासाठी असणारं स्थान या साऱ्याचा खुलासा त्याने केला. 'दबंग खान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानने चक्क एका क्रिकेटपटूलाच हे नाव दिलं आहे. याचविषयी सांगत तो म्हणाला, 'मी केदार जाधवला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. माझ्या आवडत्या क्रिकेटपटूविषयी विचाराल तर, महेंद्रसिंह धोनी हा माझा आवडता खेळाडू आहे. तो एक दबंग खेळाडू आहे.'


'स्टार स्पोर्ट्स' या वाहिनीवरील नेरोलॅक क्रिकेट लाईव्ह या प्री- शोमध्ये त्याने या गोष्टींचा उलगडा केला. यावेळी 'दबंग ३'मध्ये खलनायकी भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेता किच्चा सुदीप याचीही उपस्थिती होती. किच्चानेही त्याच्या आवडत्या खेळाडूविषयी सांगितलं. 'जो खेळाडू त्या दिवशी खूप चांगला खेळतो तोच माझ्यासाठी त्या क्षणी आवडता खेळाडू असतो. पण, एका चाहत्याच्या नजरेतून पहावं तर तो खेळाडूंप्रतीचा आदर असतो', असं सुरेख स्पष्टीकरण त्याने दिलं. असं म्हणतच त्याने अनिल कुंबळे आणि रोहित शर्मा या खेळाडूंना पसंती दिली. 



वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ


'दबंग ३'च्या निमित्ताने खास 'दबंग' फेम कलाकारांकडूनच मिळालेल्या या प्रतिक्रिया पाहता आता क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूंची त्यावर काय प्रतिक्रिया असेल हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.