मुंबई : जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय माणसाच्या हत्येनंतर अमेरिकेतलं वातावरण ढवळून निघालं आहे. जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर जगभरात 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' ही मोहीम जोरात सुरू आहे. या वादामध्येच आता वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने गंभीर आरोप केले आहेत. आयपीएलमध्ये माझ्याविरुद्ध वर्णद्वेषी टिप्पणी झाल्याचं सॅमी म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदरबादकडून खेळताना मला आणि थिसारा परेराला काळू म्हणलं जायचं, असा दावा सॅमीने केला आहे. सॅमीच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने २०१२ आणि २०१६ सालचे २ वर्ल्ड कप जिंकले. 


काळू या शब्दाचा अर्थ मला आत्ता कळाला, त्यावेळी काळू म्हणजे काहीतरी चांगला शब्द असेल, असं मला वाटलं होतं. या सगळ्याबद्दल आता मला राग येतोय, अशी पोस्ट सॅमीने इन्स्टाग्रामवर टाकली. अशाप्रकारची वर्णद्वेषी टिप्पणी कोणी केली आणि कधी करण्यात आली, याबाबत सॅमी काही बोलला नाही. 


डॅरेन सॅमी २०१३ आणि २०१४ सालच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदरबादकडून २६ मॅच खेळल्या. क्रिकेटमधल्या वर्णद्वेषावर आयसीसीने कडक पावलं उचलावीत, अशी मागणी सॅमीने केली आहे. 



'माझ्यासारख्या व्यक्तीसोबत काय होतं हे आयसीसीला दिसत नाही का? या अन्यायाविरुद्ध तुम्ही बोलणार नाही का? हे फक्त अमेरिकेपुरतचं मर्यादित नाही,' असं ट्विट सॅमीने केलं होतं. डॅरेन सॅमी वेस्ट इंडिजकडून ३८ टेस्ट, १२६ वनडे आणि ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळला आहे.