या क्रिकेटरने ३५ बॉल्समध्ये केली सेंच्युरी
क्रिकेट जगातत दररोज नवनवे रेकॉर्ड्स होत असल्याचं पहायला मिळतं. आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एक नव्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
नवी दिल्ली : क्रिकेट जगातत दररोज नवनवे रेकॉर्ड्स होत असल्याचं पहायला मिळतं. आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एक नव्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
बांगलादेश विरुद्ध खेळताना दक्षिण अफ्रिकेचा बॅट्समन डेविड मिलर याने जबरदस्त बॅटिंग करत एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. डेविड मिलरने केलेली सेंच्युरी ही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान सेंच्युरी ठरली आहे.
मिलरने आपल्या धडाकेबाज बॅटिंग करत ३५ बॉल्समध्येच सेंच्युरी लगावली. या इनिंगमध्ये त्याने ७ फोर आणि ९ सिक्सर लगावले. मिलरने केलेल्या या जबरदस्त बॅटिंगमुळे दक्षिण अफ्रिकेने २० ओव्हर्समध्ये २२४ रन्सचं आव्हान बांगलादेशसमोर ठेवलं.
त्यानंतर मैदानात आलेली बांगलादेशची टीम १४१ रन्सवरच ऑल आऊट झाली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेने ही मॅच ८३ रन्सने जिंकली. डेविड मिलर याच्यापूर्वी हा रेकॉर्ड दक्षिण अफ्रिकेच्याच लेवी याच्या नावावर होता. लेवीने झिम्बाब्वे विरोधात खेळताना ४५ बॉल्समध्ये सेंच्युरी केली होती.
फास्टेस्ट सेंच्युरी बनवणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर फाफ डू प्लिसिस आहे. त्याने ४६ बॉल्समध्ये सेंच्युरी केली. तर, चौथ्या क्रमांकावर भारताचा के. एल राहुल आहे. राहुलने वेस्टइंडिज विरोधात २०१६ साली ४६ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली होती.
मिलरने आपल्या इनिंगमध्ये ९ सिक्सर लगावले, त्यापैकी ५ सिक्सर तर त्याने एकाच ओव्हरमध्ये लगावले. १८व्या ओव्हरमध्ये बांगलादेशचा बॉलर मोहम्मद सैफुद्दीन याच्या बॉलिंगवर पहिल्या पाच बॉल्समध्ये मिलरने ५ सिक्सर लगावले.
टी-२० फॉरमॅटमध्ये ४० बॉल्सच्या आत दोन सेंच्युरी लगावणारा मिलर पहिला बॅट्समन बनला आहे. यापैकी एक सेंच्युरी त्याने आयपीएलमध्ये केली होती. २०१३ साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरोधात खेळताना मिलरने ३८ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली. आयपीएलमध्येच क्रिस गेल याच्या नावावर ३० बॉल्समध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड आहे.