भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा (South Africa) स्टार खेळाडू डेव्हिड मिलरवर (David Miller) दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  जवळील व्यक्तीचे निधन झाल्याची माहिती डेव्हिड मिलरने (David Miller) सोशल मीडियाद्वारे दिली. डेव्हिड मिलरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये तो या चिमुरडीसोबत क्रिकेट खेळताना दिसत असल्याचे दिसत आहे. एका छोट्या व्हिडीओसोबत मिलरने ' RIP माझी प्रिय राजकुमारी, मी तुला मिस करेन!', असे म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अनेकांना डेव्हिड मिलरच्या मुलीचे निधन झाल्याचे वाटत आहे. जे साफ खोटं आहे. डेव्हिड मिलरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची मुलगी नसून त्याची चाहती आहे. डेव्हिड मिलरची खास चाहती असलेल्या अॅनीचे (Ane) 8 ऑक्टोबर रोजी निधन झालं आहे.  अॅनी मिलरच्या खूप जवळची चाहती होती. 


अनेकांना मिलरचा हा व्हिडीओ पाहून ती त्याची मुलगी आहे असे वाटले पण तसे नाही. ही मिलरची सर्वात खास आणि मोठी चाहती होती. अॅनी कॅन्सरने त्रस्त होती. मिलरने व्हिडिओसह आणखी कोणतीही माहिती दिलेली नाही.



दरम्यान, डेव्हिड मिलर तीन टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा मधल्या फळीतील फलंदाज भारताविरुद्ध उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाबाद 106 धावांची खेळी केली. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही नाबाद 75 धावांची खेळी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध विजय नोंदवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.


मिलरने दक्षिण आफ्रिकेसाठी 147 एकदिवसीय आणि 107 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 5 शतके आणि 18 अर्धशतकांसह 41.54 च्या सरासरीने 3614 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने टी-20 मध्ये 2069 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर दोन शतके आणि 5 अर्धशतके आहेत.