David Warner: आयपीएलच्या सोळाव्या सिझनमध्ये मंगळवारी गुजरात टायटन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC vs GT) यांच्यामध्ये सामना रंगला होता. यंदाच्या सिझनमध्ये गुजराटत टायटन्स पुन्हा उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतायत. मंगळवारच्या सामन्यात गुजरातने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने मोठं वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानावर गुजरातने पराभवाचा धक्का दिला. गुजरातने तब्बल सहा विकेटने दिल्ली  कॅपिटल्सचा पराभव केला. तर दुसरीकडे दिल्लीचा हा दुसरा पराभव ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने 8 विकेट गमावत 162 रन्स केले होते. तर विजयाचं हे आव्हान गुजरात टायटन्सने 4 विकेट गमावत पार केलं.


पराभवानंतर काय म्हणाला वॉर्नर


दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा पराभव होता. या पराभवानंतर वॉर्नर म्हणाला, सुरुवातीला बॉल प्रचंड स्विंग होत होता. मला त्याचा अंदाज अजिबात आला नव्हता. दरम्यान या सामन्यात परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं हे समोरच्या टीमने योग्य पद्धतीने दाखवून दिलं. त्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. 


वॉर्नर पुढे म्हणाला, या मैदानावर आम्ही अजून सहा सामने खेळणार आहोत. मात्र आज गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. याशिवाय सुदर्शनने देखील चांगली फलंदाजी केली.


साई सुदर्शनने धुतलं


दिल्लीने गुजरातसमोर विजयासाठी 162 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. सुदर्शनने 48 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकार लगावत नाबाद 62 रन्सची विजयी खेळी केली. यापूर्वी विजय शंकर आणि डेव्हिड मिलरची यांची चांगली पार्टनरशिप झाली. विजय शंकर 29 रन्स करुन बाद झाला. तर डेव्हिड मिलर 31 रन्सवर नाबाद राहिला. ओपनिंगला आलेले ऋधीमान साहा आणि शुभमन गिल यांना मोठी खेळी करता आली नाही. तर कर्णधार हार्दिक पांड्या अवघ्या 5 रन्सवर माघारी परतला.


पॉईंट टेबलमध्ये गुजरातचा बोलबाला


आयपीएलच्या 16 व्या सिझनच्या सामन्यांना आताशी सुरुवात झाली आहे. मात्र तरीही पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातच्या टीमचा बोलबाला दिसून येतोय. सलग दुसऱ्या विजयासह गुजरात टायटन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. गुजरातच्या खात्यात चार पॉईंट्स जमा झाले असून दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सची टीम आहे. तर आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे.