एका वर्षाच्या बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरला आणखी एक झटका
बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला वैयक्तिक आयुष्यातही मोठा झटका बसला आहे.
मेलबर्न : बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला वैयक्तिक आयुष्यातही मोठा झटका बसला आहे. बॉल छेडछाड प्रकरणाची कबुली दिल्यानंतर एका आठवड्यामध्येच डेव्हिड वॉर्नरची पत्नी कॅन्डिस वॉर्नरचा गर्भपात झाला होता. खुद्द कॅन्डिसनंच हे वक्तव्य केलं आहे. डेव्हिड वॉर्नरनं बॉल कुरतडल्याचं मान्य केल्यावर आठवड्याभरामध्येच आम्ही आमचं बाळ गमवल्याचं कॅन्डिस म्हणाली. बाथरूममध्ये असताना रक्तस्त्राव होत असल्याचं मला दिसलं यानंतर मी डेव्हिडला ही घटना सांगितली. यानंतर आम्हाला आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचं कळलं. बॉल छेडछाड प्रकरणामुळे आम्ही खचून गेलो होतो. या ताणामुळे आम्हाला बाळ गमवायची वेळ आली, अशी प्रतिक्रिया कॅन्डिस वॉर्नरनं दिली.
आम्हाला तिसरं मुल हवं होतं. केपटाऊनमध्ये असताना गर्भवती असल्याचं आमच्या लक्षात आलं होतं. पण या सगळ्या घटनाक्रमाचा आमच्या वैयक्तिक आयुष्यावरही गंभीर परीणाम झाल्याचं कॅन्डिस म्हणाली. वॉर्नर दाम्पत्याला आयव्ही माय आणि इंडी राय या तीन आणि दोन वर्षांच्या मुली आहेत.
काय होता बॉल छेडछाडाची वाद?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निलंबन झालं. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. तर कॅमरून बँक्रॉफ्टचं ९ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही कारवाई केली. याप्रकरणामध्ये वॉर्नर हा प्रमुख सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे तो आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होऊ शकणार नाही.