कोटला मैदानात सेहवागच्या नावाचं गेट, पण DDCAकडून चूक
भारत आणि न्यूझीलंडमध्ये दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानामध्ये पहिली टी-२० मॅच होणार आहे.
नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंडमध्ये दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानामध्ये पहिली टी-२० मॅच होणार आहे. भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरा त्याची शेवटची मॅच खेळणार आहे. पण या मॅचआधी फिरोजशहा कोटला मैदानाच्या एका गेटला विरेंद्र सेहवागचं नाव देण्यात आलं. पण गेटला नाव देताना डीडीसीए म्हणजेच दिल्ली डिसट्रिक्ट क्रिकेट असोसिएशननं मोठी चूक केली आहे.
डीडीसीएनं मंगळवारी फिरोजशहा कोटला स्टेडियमच्या गेट नंबर ३ ला भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचं नाव दिलं. पण आकडेवारी लिहिताना डीडीसीएनं मोठी चूक केली आहे.
गेटवर सेहवागचं कटआऊट लावण्यात आलं आहे. सेहवाग 'लिजंड्स आर फॉरएव्हर' असं या कटआऊटवर लिहिण्यात आलं आहे. सोबतच सेहवागच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीचे आकडेही या कटआऊटवर लावण्यात आलेत.
टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा एकमेव भारतीय, असं या कटआऊटवर लावण्यात आलं आहे. पण टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा सेहवाग हा एकमेव भारतीय खेळाडू नाही. काहीच महिन्यांपूर्वी करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये त्रिशतक झळकावलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं झळकावणारा सेहवाग एकमेव भारतीय आहे.
सेहवागनं टेस्टमधलं पहिलं त्रिशतक पाकिस्तानविरुद्ध २००४साली मुलतानमध्ये लगावलं होतं. पाकिस्तानविरुद्धच्या या मॅचमध्ये सेहवगानं ३०९ रन्सची खेळी केली होती. तर यानंतर ४ वर्षांनी सेहवागनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचवेळी चेन्नईमध्ये ३१९ रन्सची खेळी केली होती.