मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण या वर्ल्ड कप आधीच्या शेवटच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ३-२ ने पराभव केला. वर्ल्ड कप आधीचा हा पराभव भारतासाठी धोक्याची घंटा असल्याचं मत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ मॅचच्या वनडे सीरिजमधल्या पहिल्या २ मॅच भारताने जिंकल्या, पण यानंतरच्या तिन्ही मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंग्लंडमध्ये जाऊन आपण आरामात वर्ल्ड कप जिंकू असा समज झाला होता. पण हा पराभव झाला ते चांगलं झालं. यामुळे आता आपल्याला वर्ल्ड कपमध्ये खूप चांगलं खेळावं लागेल, हे भारतीय खेळाडूंना कळलं असेल', असं द्रविड म्हणाला. राहुल द्रविड हा संजय मांजरेकरशी ईएसपीएनक्रिकइन्फो या वेबसाईटवर बोलत होता.


'मागच्या दोन वर्षांमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाला. या पराभवानंतरही वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारत दावेदार आहे. पण हा वर्ल्ड कप जिंकणं कोणत्याही टीमला सोपं जाणार नाही. या वर्ल्ड कपमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळेल,' असं द्रविडला वाटतं.


वर्ल्ड कपआधी भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. २३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप लक्षात घेता खेळाडूंना शारिरिक तणाव आणि दुखापत होऊ नये, म्हणून आयपीएलच्या काही मॅचमध्ये खेळाडूंनी विश्रांती घ्यावी, अशी मागणी होत आहे. राहुल द्रविडने या मागणीवरही प्रतिक्रिया दिली आहे.


'प्रत्येक खेळाडू याबाबतीत हुशार आहे. त्याला स्वत:च्या शरिराची काळजी कशी घ्यायची हे माहिती आहे. खेळाडू त्यांच्या शरिराविषयी निष्काळजीपणा करणार नाहीत. विश्रांती घेतल्यानंतर खेळण्यापेक्षा सातत्याने क्रिकेट खेळत असतानाच माझ्या शरिराला चांगलं वाटतं, असं ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सने सांगितल्याचं मी वाचलं. त्यामुळे प्रत्येक खेळाडूसाठी गोष्टी वेगळ्या असतात. सगळ्यांना एकच नियम लागू होऊ शकत नाही. आपल्याला खेळाडूंवरच विश्वास दाखवावा लागेल.' असं द्रविड म्हणाला.