मला भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल- सौरव गांगुली
अर्ज केल्यानंतर निश्चितपणे माझी निवड होईल.
कोलकाता: भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानेही आपण प्रशिक्षकपदासाठी इच्छूक असल्याचे सांगितले.
मला नक्कीच भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल. परंतु, यावेळी नाही. आणखी एक टप्पा पार पडू दे. यानंतर मी प्रशिक्षकपदासाठी अर्ज करेन, असे गांगुलीने सांगितले.
सौरव गांगुली सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. याशिवाय, आयपीएल स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटलच्या संघाशी संबंधित आहे. तसेच गांगुली क्रीडा वाहिन्यांसाठी समालोचनाचेही कामही करतो. या सगळ्या जबाबदाऱ्यांतून मुक्त झाल्यावर मी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करेन. अर्ज केल्यानंतर निश्चितपणे माझी निवड होईल. त्यामुळे मला प्रशिक्षकपदात रस असला तरी तुर्तास ती वेळ आलेली नाही, असे गांगुलीने स्पष्ट केले.
भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. ३० जुलैरोजी या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत टॉम मूडी, रॉबिन सिंह, लालचंद राजपूत, माईक हेसन, गॅरी कस्टर्न यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी तर प्रविण आमरे यांनी फलंदाजी प्रशिक्षक तर आफ्रिकन खेळाडू जॉन्टी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी अर्ज दाखल केला आहे.
बीसीसीआयने प्रशिक्षक निवडीसाठी माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांची समिती स्थापन केली आहे.