मुंबई : आयपीएलचा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघ चढाओढ करत आहे. त्यात आता गुजरात टायटन्स आणि लखनऊचे प्लेऑफचे स्थान निश्चित मानलं जातंय. तर आता आणखीण कोणत्या टीम प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दिल्लीच्या संघातला विस्फोटक फलंदाज पुन्हा मैदानात उतरायला सज्ज झालाय. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचण्याच्या दिल्लीच्या आशा वाढल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने या संदर्भातले निवेदन प्रसिद्ध करत माहिती दिलीय. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या निवेदनात म्हटले की, 'पृथ्वी शॉला टायफॉइड होता.त्याच्यावर यशस्वी उपचार करत त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.' "पृथ्वी शॉ हॉटेलमध्ये परतला असून सध्या तो बरा झालाय.दिल्लीचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे."


पृथ्वी शॉने 1 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्ससाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर दिल्लीच्या तीन सामन्यांना पृथ्वी मुकला होता. आता दिल्ली प्लेऑफसाठी लढत आहे. सोमवारी दिल्लीचा सामना पंजाब विरूद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वीच दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. त्यामुळे तो मैदानात वापसी करण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्लीची ताकद वाढणार असून प्लेऑफची शर्यत दिल्लीसाठी काहीशी सोप्पी होणार आहे.  


आयपीएलमधील कामगिरी 


पृथ्वी शॉने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये २८.७८ च्या सरासरीने २५९ धावा केल्या आहेत आणि या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट १५९.८८ आहे. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. 


दरम्यान दिल्लीच्या संघाने आता 12 सामन्यांत 12 गुण जमा केले असून त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील.