आयपीएलमधून दिल्ली आऊट
आयपीएलच्या ११व्या हंगामातू दिल्लीचा संघ बाद झालाय. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला विजयाची अंत्यत आवश्यकता होती संघाला विजय मिळवण्यात अपयश आले.
मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामातू दिल्लीचा संघ बाद झालाय. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला विजयाची अंत्यत आवश्यकता होती संघाला विजय मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे दिल्लीला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाहीये. हैदराबादने गुरुवारच्या सामन्यात दिल्लीवर ९ विकेटने विजय मिळवत प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली. कालचा सामना दिल्लीसाठी करो वा मरोचा होता. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात हा सामना खेळवण्यात आला होता. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने २० षटकांत ५ बाद १८७ इतकी धावसंख्या उभारली. मात्र हैदराबादने हे लक्ष्य १८.५ षटकांत एका विकेटच्या नुकसानाच्या बदल्यात पूर्ण केले.
या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या विकेटसाठी १५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर धवन आणि केन विल्यमसन्स यांनी मैदानावर धावांचा पाऊस पाडला. या दोघांमध्ये १७६ धावांची भागीदारी झाली. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर हैदराबादला हा विजय साकारता आला. दिल्लीचे आयपीएलमधील आव्हान मात्र संपुष्टात आले.
दिल्लीचे गुणतालिकेत ६ गुण असून खालून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हैदराबाद या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर धोनीचा चेन्नई संघ आहे.
संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे काही दिवसांपूर्वीच गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले होते. गंभीरने हे पद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरकडे नेतृत्व देण्यात आले होते.