दारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड, दिलजीतच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची झाली भयंकर अवस्था
गायक दिलजीत (Diljeet Concert) याच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची जी अवस्था झाली ती पाहून खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. स्टेडियम परिसरात दारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड झाली असून मोठे नुकसान झाले आहे.
Diljit's concert : दिल्लीच जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे खेळाडूंची पांढरी म्हणून ओळखलं जातं. येथे अनेक खेळाडू ट्रेनिंग घेतात, मेहनत करतात आणि देशाला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून देतात. मात्र गायक दिलजीत (Diljeet Concert) याच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची जी अवस्था झाली ती पाहून खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. स्टेडियम परिसरात दारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड झाली असून मोठे नुकसान झाले आहे. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी गायक दिलजीत दिसांझ याचा कॉन्सर्ट पार पडला. दिलजीतचा हा कॉन्सर्ट बनावट तिकिटांमुळे खूप चर्चेत राहिला. या कॉन्सर्टच्या बनावट तिकिटांची विक्री करून काही टोळ्यांनी प्रेक्षकांची हजारो रुपयांची फसवणूक केली होती. मात्र हा कॉन्सर्ट पूर्ण झाल्यावरही वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याच कारण म्हणजे कॉन्सर्टसाठी आलेल्या प्रेक्षकांनी स्टेडियमच्या सामग्रीची केलेली तोडफोड. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये खेळाडूंच्या रनिंग ट्रॅकवर सडलेलं अन्न, दारूच्या बाटल्या तुटलेल्या खुर्च्या, तसेच रनिंगसाठी तयार केलेले हर्डल्स सुद्धा तुटलेले पाहायला मिळतायत. स्टेडियमच्या झालेल्या अशा अवस्थेमुळे दुसऱ्या दिवशी स्टेडियमवर आलेल्या खेळाडूंना त्यांची प्रॅक्टिस सोडावी लागली. धावपटू बेअंत सिंह याने हा व्हिडीओ शेअर केलेला आहे.
हेही वाचा : टीम इंडियाचा हेड कोच बदलला, साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी 'या' माजी क्रिकेटरवर सोपवली जबाबदारी
गायक दिलजीत दिसांझच्या या कॉन्सर्टसाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) आणि सारेगामा यांच्यात कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. यासाठी कॉन्सर्टच्या आयोजकांनी 1 नोव्हेंबरपर्यंत स्टेडियम भाड्यावर घेतलं आहे. तेव्हा कॉन्सर्टनंतर स्टेडियमवर झालेला कचरा साफ करण्यात येईल. कॉन्सर्ट आयोजकांच्या सांगण्यानुसार स्टेडियम 1 नोव्हेंबरपूर्वीच स्वच्छ करून चांगल्या स्थितीत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला स्टेडियमचा हॅन्डओव्हर दिला जाईल.
सध्या स्टेडियमवर कोणतेही राज्य आणि नॅशनल, इंटरनॅशल लेव्हलच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार नाहीत. 'या आणि खेळा' या योजने अंतर्गत काही खेळाडू संध्याकाळी येथे येऊन प्रॅक्टिस करतात. याचसाठी 28 ऑक्टोबरला काही खेळाडू येथे आले होते तेव्हा स्टेडियममध्ये साफसफाई करण्याचा काम सुरु होते. स्टेडियममध्ये अजूनही साफसफाईचे काम सुरु आहे असे त्यांनी सांगितले.