मुंबई: देवधर चषक स्पर्धेत शनिवारी भारत ब आणि भारत क यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यावेळी एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. भारत क संघाचे नेतृत्व करणाऱ्या रहाणेने देशांतर्गत सामन्यांमध्ये यंदाच्या मोसमात प्रभावी कामगिरी केली आहे. देवधर चषक स्पर्धेतही त्याचा हा फॉर्म कायम आहे. अंतिम सामन्यातही त्याने शतकी खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, या शतकाचे सेलिब्रेशन रहाणेने ९७ धावांवर असतानाच केले. रहाणे ९६ धावांवर फलंदाजी करत असताना मयांक मार्कंडेयचा चेंडू टोलवून एक धाव काढली. त्यावेळी मैदानातील धावफलकावर रहाणेच्या १०० धावा पूर्ण झाल्याचे दाखवले गेले. त्यामुळे अजिंक्यनेही बॅट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन केले. यावेळी मैदानात एकच जल्लोष झाला. 


परंतु, त्यावेळी प्रत्यक्षात रहाणेच्या ९७ धावा झाल्या होत्या. ड्रेसिंग रूममधील खेळाडू आणि समालोचकांना ही चूक लक्षात आली. तेव्हा अजिंक्यचा सहकारी सुरेश रैनाने ड्रेसिंग रुममधून इशारा करून तुला शतकासाठी आणखी तीन धावा हव्यात असे सांगितले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रहाणेलाही हसू फुटले. यानंतर काही वेळातच त्याने आपले शतक पूर्ण केले. अजिंक्य रहाणेने या सामन्यात नाबाद १४४ धावा पटकावून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.