IPL 2020 साठी डिव्हिलियर्स सज्ज, इन्स्टावर खास फोटो केला शेअर
एबी डी मैदानात उतरण्यासाठी उत्सूक
दुबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स आयपीएलमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहे. यामुळेच क्रिकेट चाहते आयपीएल २०२० ची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण या आयपीएल हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेलेल्या एबी डिव्हिलियर्सची फलंदाजी पुन्हा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट चाहत्यांना एक संदेश दिला आहे. एबीने आयपीएल -13 साठी कंबर कसली आहे आणि लवकरच तो मैदानात पदार्पण करण्यास उत्सुक आहे.
किट बॅगसह फोटो केला शेअर
क्रिकेट जगतात मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एबी डिव्हिलियर्स त्याच्या क्रिकेट किट बॅगसह दिसत आहे. एबीडी कडे एक बॅट आहे. सोबतच कोरोनामुळे त्याने मास्क देखील लावलं आहे.
दुसरीकडे एबी डिव्हिलियर्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दुबईमधील त्याचा क्वारंटाईन कालावधी संपला असून आता तो मैदानात परतण्यासाठी उत्सूक आहे. बुधवारी एबी डिव्हिलियर्सची आयपीएल टीम आरसीबीचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. गुरुवारपासून टीमचा तीन आठवड्यांचा सराव सुरू होणार आहे. एबी डीव्हिलियर्ससह आरसीबीच्या सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला असून संघ सरावासाठी मैदनात उतरण्यासाठी सज्ज आहे.
आयपीएलच्या सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये एबी डिव्हिलियर्सचे नाव आहे. डीव्हिलियर्सने 154 आयपीएल सामन्यांमध्ये 39.95 च्या सरासरीने 4,395 धावा केल्या आहेत. याबरोबरच एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 3 शतके आणि 33 अर्धशतकेही केली आहेत. तर नाबाद 133 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणाऱ्यांच्या यादीत एबी डी 212 सिक्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एबी डिव्हिलियर्स 9 व्या क्रमांकावर आहे.