लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या मॅचमध्ये कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेताना कोहलीची डोकेदुखी वाढणार आहे. यातली महत्त्वाची चिंता म्हणजे मुरली विजयसोबत ओपनिंगला शिखर धवनला संधी द्यायची का लोकेश राहुलला. परदेशी मैदानातल्या टेस्टमध्ये शिखर धवनला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्येही पहिल्या टेस्टनंतर शिखर धवनला टीमबाहेर राहावं लागलं होतं. धवनऐवजी तेव्हाही राहुलला संधी देण्यात आली पण राहुललाही फारसं यश मिळालं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकडेवारीवर नजर टाकली तर शिखर धवनचं आशिया खंडाबाहेरचं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. एसेक्सविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये शिखर धवन शून्य रनवर आऊट झाला. पण राहुलनं याच मॅचमध्ये ९२ बॉलमध्ये ५८ रन केले.


शिखर धवननं एकूण ३० मॅचमध्ये ४३.९३ च्या सरासरीनं २५१३ रन केल्या आहेत. यामध्ये ७ शतकांचा समावेश आहे. देशाबाहेर धवननं १९ मॅचमध्ये ४३.७२ च्या सरासरीनं १४४३ रन केल्या. परदेशामध्ये धवनची ५ शतकं आहेत. पण ही शतकं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजमध्ये नाही तर बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये लगावण्यात आली.


शिखर धवननं इंग्लंडमध्ये ३ मॅचमध्ये २० च्या सरासरीनं १२२ रन केले. दक्षिण आफ्रिकेमध्ये धवनला ३ मॅचमध्ये १८ च्या सरासरीनं फक्त १०८ रन करता आल्या. ऑस्ट्रेलियामध्ये धवननं ३ मॅचमध्ये २७ च्या सरासरीनं १६७ रन केल्या. या तिन्ही देशांमध्ये धवनला एकही शतक किंवा अर्धशतक करता आलेलं नाही.


राहुलचं परदेशातलं रेकॉर्ड चांगलं


लोकेश राहुलनं आत्तापर्यंत २४ टेस्ट मॅचमध्ये १५१२ रन केल्या आहेत. यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे. परदेशामध्ये राहुनं १२ टेस्ट मॅचमध्ये ६६४ रन केल्या. १५८ रन हा राहुलचा सर्वाधिक स्कोअर आहे. परदेशामध्ये राहुलनं ३४.९४ च्या सरासरीनं रन केलं. राहुलनं ३ शतकं परदेशातच केली आहेत.