धोनीची बॅटिंग पाहून गावसकर यांना ती खेळी आठवली
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८६ रननी पराभव झाला.
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८६ रननी पराभव झाला. या मॅचमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रनची खेळी केली. धोनीच्या या संथ खेळीवर टीका होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं धोनीच्या या खेळीवर प्रश्न उपस्थित केले. तर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही त्यांचं मत मांडलं आहे. धोनीच्या खेळीमुळे मला माझी १९७५ सालच्या वर्ल्ड कपची खेळी आठवल्याचं गावसकर म्हणाले. १९७५ सालच्या वर्ल्ड कपमधील इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये गावसकर यांनी १७४ बॉलमध्ये ३६ रन केल्या होत्या. या मॅचमध्ये भारताचा २०२ रननी पराभव झाला होता.
एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभामध्ये गावसकर यांनी भारताच्या पराभवावर भाष्यं केलं आहे. यामध्ये गावसकर यांनी शिखर धवननं मारलेल्या चुकीच्या फटक्याचाही समाचार घेतला. धवन चांगला खेळत होता पण त्यानं बेफिकीर शॉट मारला. रैनानं त्याचा अनुभव दाखवण्याचा प्रयत्न करला पण यामध्ये तो अपयशी ठरला, असं गावसकर म्हणाले.
धोनीवरच्या टीकेवर कोहलीचं उत्तर
लोकं एवढ्या लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचतात हे दुर्भाग्यपूर्ण आहे. जेव्हा धोनी चांगलं खेळतो तेव्हा तो सर्वोत्तम फिनिशर असतो पण जेव्हा गोष्टी हव्या तश्या होत नाहीत तेव्हा त्याच्यावर टीका होते. धोनीकडे अनुभव आहे पण प्रत्येकवेळी तुम्हाला हव्या तसंच होत नाही. आम्हाला धोनीवर आणि त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे, असं कोहली म्हणालाय.