मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मॅचच्या मालिकेमध्ये भारताचा २-१नं विजय झाला. महेंद्रसिंग धोनी भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. तिन्ही मॅचमध्ये धोनीनं अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे त्याला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून फॉर्मसाठी झगडणाऱ्या धोनीला अखेर या मालिकेमध्ये सूर गवसला. पण ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना धोनी हा भारतीय संघातली मोठी समस्या असल्याचं वक्तव्य केलं आहे. जोन्स यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये याबाबत एक लेख लिहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतला भारतीय संघामध्ये जागा करुन देण्यात धोनी हीच मोठी अडचण असल्याचं डीन जोन्स यांना वाटतंय. ऋषभ पंतनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीचं डीन जोन्स यांनी कौतुक केलं आहे. धोनी संघात आल्यामुळे आता ऋषभ पंतला फक्त फलंदाज म्हणून खेळवण्याचा विचार भारतीय संघ करू शकतो का? असा सवालही जोन्स यांनी उपस्थित केला.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धोनीनं ९६ बॉलमध्ये ५१ धावांची खेळी केली. या संथ खेळीमुळे धोनीवर टीका करण्यात आली. यानंतर पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये धोनीनं त्याच्या टीकाकारांना चोख उत्तर दिलं. दुसऱ्या सामन्यात धोनीनं ५४ बॉलमध्ये ५५ धावा आणि तिसऱ्या सामन्यात ८७ धावा केल्या.


वर्ल्ड कपची तयारी करणाऱ्या भारतीय संघाला यापेक्षा चांगला निकाल मिळाला नसता. आता भारतीय संघानं न्यूझीलंडलाही हरवलं पाहिजे, असं डीन जोन्स म्हणाले. तसंच सध्याचा भारतीय संघ हा ८० आणि ९०च्या दशकातल्या वेस्ट इंडिजच्या संघासारखाच भीतीदायक आहे. सध्याचा भारतीय संघ आणि तेव्हाचा वेस्ट इंडिजचा संघ यामध्ये काहीही फरक नाही. भारतीय संघानं कोणत्याही ठिकाणी जिंकण्याचा नावलौकिक मिळवला आहे, तो त्यांनी कायम ठेवावा, असं डीन जोन्स यांनी लिहिलं आहे. या कामगिरीचा भारतीय संघाला वर्ल्ड कपला जाताना फायदा होईल, असं जोन्स यांना वाटतं.


ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारत ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. २३ जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.