हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारतात बनलेल्या एसजी बॉलऐवजी दुसऱ्या बॉलनं टेस्ट क्रिकेट खेळण्यात यावं, अशी मागणी विराटनं केली आहे. जगभरात इंग्लंडमध्ये बनलेल्या ड्यूक बॉलनं टेस्ट क्रिकेट खेळावं, असं विराट म्हणाला. विराटनं आक्षेप घेतलेल्या एसजी बॉलमध्ये आणि जगभरात वापरण्यात येणाऱ्या कुकाबुरा आणि ड्यूक बॉलमध्ये काय फरक आहे यावर एक नजर टाकूयात.


बॉलमध्ये फरक काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतामध्ये टेस्ट क्रिकेटसाठी स्वदेशी एसजी बॉलचा वापर होतो. तर इंग्लंड, वेस्ट इंडिजमध्ये ड्यूक आणि ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, झिम्बाव्बे आणि श्रीलंकेमध्ये कुकाबुरा बॉलचा वापर होतो.


कुकाबुरा, एसजी आणि ड्यूक बॉलमध्ये सीमचा फरक असतो. कुकाबुरा बॉलची सीम आतल्या बाजूला असते. यामुळे हा बॉल सुरुवातीच्या २० ओव्हरमध्ये स्विंग होतो. पण २० ओव्हरनंतर सीम गेल्यावर बॅट्समनना खेळणं सोपं होतं. पण कुकाबुरा बॉलची सीम गेल्यानंतर स्पिनरना बॉल पकडणं कठीण होतं.


ड्यूक बॉलची सीम नीट ठेवली तर ५० ते ५५ ओव्हरपर्यंत शाबूत राहते. यामुळे ड्यूक बॉल जास्त ओव्हरपर्यंत स्विंग होऊ शकतो. ड्यूक बॉल हा बॉलरना सर्वाधिक मदत करणारा बॉल म्हणून ओळखला जातो.


एसजी बॉलची सीम ही वरच्या बाजूला असते. पण एसजी बॉल फक्त १० ओव्हरपर्यंत स्विंग होतो. एसजी बॉलची चमकही लवकर फिकी पडते. पण सीम ८०-९० ओव्हरपर्यंत अखंड राहते. यामुळे ४०-५० ओव्हरनंतर एसजी बॉल रिव्हर्स स्विंग होतो. तसंच बॉलची सीम वरच्या बाजुला असल्यामुळे स्पिनरनाही बॉल पकडणं आणि बॉल स्पिन करणं सोपं जातं.


कुकाबुरा बॉल हा एसजी बॉलच्या कित्येक पट महाग असतो. एसजी बॉल कुकाबुरा बॉलपेक्षा १/७ कमी किंमतीला मिळतो.