मुंबई : आयपीएलच्या २०२० सालासाठीचा खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला पार पडला. या लिलावानंतर लगेचच मुंबईच्या टीमला धक्का बसला आहे. आयपीएल लिलावात मुंबईने दिग्विजय देशमुखला २० लाख रुपयांना विकत घेतलं होतं. पण आता दिग्विजयला आक्षेपार्ह बॉलिंग ऍक्शनमुळे रणजी ट्रॉफीच्या महाराष्ट्राच्या टीमकडून वगळण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२१ वर्षांचा ऑलराऊंडर असणाऱ्या दिग्विजय देशमुख याने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत ९ विकेट घेतल्या. तर रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये त्याने एकूण ६ विकेट घेतल्या आणि आठव्या क्रमांकावर बॅटिंग करताना ८१ रनही केले. पण या मॅचनंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिग्विजय देशमुखच्या आक्षेपार्ह बॉलिंग ऍक्शनबाबत सविस्तर रिपोर्ट देण्यात आला. यानंतर दिग्विजयच्या बॉलिंग ऍक्शनवर निर्णय होईपर्यंत त्याला महाराष्ट्राकडून वगळण्यात आलं आहे. दिग्विजय देशमुखचं निलंबन मात्र करण्यात आलेलं नाही.


दिग्विजय देशमुखला मुंबईच्या टीमने आयपीएलमध्ये घेतलं आहे. आम्हाला त्याचा आत्मविश्वास कमी करायचा नाही. दिग्विजय हा उदयोन्मुख बॉलर आहे, त्यामुळे आम्ही त्याला एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये पाठवणार आहोत. या ठिकाणी त्याच्या बॉलिंग ऍक्शनची चाचणी घेण्यात येईल, असं एमसीएचे सचिव रियाझ बागवान यांनी सांगितलं.


दिग्विजय देशमुख याने अली हाशमीच्या काय पो छे या चित्रपटातही काम केलं आहे. २०१३ साली आलेल्या या चित्रपटात दिग्विजय देशमुख सुशांतसिंग राजपूत, अमित साध, राजकुमार राव, मानव कौल यांच्यासोबत दिसला. सुशांत, अमित आणि राजकुमार हे एका लहान मुलाला मोठा क्रिकेटपटू बनवण्यासाठी झटत असतात. या मुलाचं काम दिग्विजय देशमुखने केलं आहे. १४ वर्षांचा असताना दिग्विजय या चित्रपटात दिसला, आता ७ वर्षानंतर त्याने रणजीमध्ये पदार्पण केलं.