`म्हणून भारतीय टीममध्ये कमबॅक झालं`
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी शानदार विजय झाला.
पुणे : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी शानदार विजय झाला. या विजयाबरोबरच तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं १-१नं कमबॅक केलं. मुंबईमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये न्यूझीलंडचा विजय झाला होता, त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम राखण्यासाठी भारताला पुण्यातली दुसरी वनडे जिंकणं आवश्यक होतं.
दुसऱ्या वनडेमध्ये भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले भुवनेश्वर कुमार, शिखर धवन आणि दिनेश कार्तिक. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कमबॅक करणारा दिनेश कार्तिक यशस्वी ठरला आहे. १९व्या वर्षी दिनेश कार्तिकनं भारताकडून खेळायला सुरुवात केली पण १३ वर्षानंतरही कार्तिकचं टीममधलं स्थान अजूनही पक्कं नाही.
२०१५च्या वर्ल्डकपनंतर भारतानं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ११ खेळाडूंना मैदानात उतरवलं. धोनी, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेमध्ये भारतानं चौथ्या क्रमांकावर कार्तिकला मैदानात पाठवलं.
दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आऊट झाल्यावर दिनेश कार्तिकनं ६४ रन्सची खेळी केली. दिनेश कार्तिकच्या या महत्त्वपूर्ण खेळीमुळे २३१ रन्सचं लक्ष्य भारतानं सहज पार केलं.
भारतीय टीममध्ये यशस्वी कमबॅक करण्याचं श्रेय कार्तिकनं कॅप्टन विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीला दिलं आहे. कमबॅक केल्यानंतरचा खेळ चांगला सुरु आहे. मी आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी थोडा वेळ लागेल पण रन बनतील असा मला विश्वास असल्याचं कार्तिक म्हणाला आहे.