मुंबई : टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने बीसीसीआयची माफी मागितली आहे. शिस्तभंग केल्याप्रकरणी बीसीसीआयने दिनेश कार्तिकला नोटीस पाठवली होती. या नोटीसला उत्तर देताना कार्तिकने बीसीसीआयची माफी मागितली. दिनेश कार्तिक बुधवारी सुरु झालेल्या कॅरेबियन प्रिमियर लीगच्या मॅचदरम्यान त्रिनबागो नाईट रायडर्सच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला होता. यानंतर बीसीसीआयने कार्तिकला नोटीस पाठवली. ७ दिवसांमध्ये या नोटीसला उत्तर द्यायचे आदेश बीसीसीआयने दिले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या नोटीसला उत्तर देताना कार्तिक म्हणाला, '४ सप्टेंबरला पहिल्या मॅचमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्सनी मला ड्रेसिंग रूममधून मॅच बघण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. या मॅचमध्ये मी त्रिनबागो नाईट रायडर्सच्या टीमची जर्सीही घातली. याप्रकरणी मी बीसीसीआयची बिनशर्त माफी मागतो. ब्रॅण्डन मॅक्कलमने बोलवल्यामुळे मी तिकडे गेलो होतो. ब्रॅण्डन मॅक्कलम हा आयपीएलच्या कोलकाता टीमचा आणि त्रिनबागो टीमचाही प्रशिक्षक आहे. कोलकाता टीमचा कर्णधार म्हणून मला त्याच्यासोबत चर्चा करायची होती. तसंच माझं इकडे येणं उपयोगी ठरेल, असं मॅक्कलमला वाटत होतं.'



कार्तिकला त्रिनबागोच्या ड्रेसिंग रूममध्ये जाण्याआधी बीसीसीआयची परवानगी घेणं आवश्यक होतं. कारण कार्तिक हा बीसीसीआयशी करारबद्ध झालेला खेळाडू आहे, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.


त्रिनबागो नाईट रायडर्स आणि आयपीएलमधली कोलकात्याची टीम या शाहरुख खानच्या मालकीच्या आहेत. परदेशी टी-२० लीगमध्ये भारतीय खेळाडूंनी सहभाग नोंदवू नये, असा बीसीसीआयचा नियम आहे. आत्तापर्यंत फक्त युवराज सिंगलाच कॅनडा टी-२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. युवराजनेही बीसीसीआयकडे तशी परवानगी मागितली होती.